Join us

स्वायत्ततेच्या घोळामुळे एमबीएचे प्रवेश टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:57 AM

वेदांतला (बदललेले नाव) एमबीएला प्रवेश घ्यायचा असून त्याचा ऑल इंडिया रँक ४० च्या आतील आहे, तर सीईटीमध्ये त्याला ९९.९९ इतके गुण मिळाले आहेत.

- सीमा महांगडेमुंबई : वेदांतला (बदललेले नाव) एमबीएला प्रवेश घ्यायचा असून त्याचा ऑल इंडिया रँक ४० च्या आतील आहे, तर सीईटीमध्ये त्याला ९९.९९ इतके गुण मिळाले आहेत. मात्र प्रवेशासाठी पात्र असूनही त्याला जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्याने अखेर उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.जमनालाल बजाज महाविद्यालयाच्या स्वायत्ततेची स्थिती निश्चित नसल्याने अनेक एमबीए प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांच्या प्रवेशांवर टांगती तलवार आहे. अखेर यासंदर्भात ९ विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बजाज महाविद्यालयाला या पार्श्वभूमीवर नोटीस पाठविण्यात आली असून शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी आहे. दरम्यान, महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना स्वायत्तता नसल्याचे दाखवून त्या पार्श्वभूमीवर प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. त्यामुळे चांगले गुण असूनही पसंतीच्या महाविद्यालयातील जागांना मुकावे लागणार असल्याची खंत अनेक विद्यार्थी व्यक्त करत आहेत.सीईटी कक्षाकडून इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी ९ ते १० मार्च २०१९ दरम्यान सीईटी झाली. या परीक्षेचा निकाल ३० मार्च रोजी जाहीर झाला. दरम्यान, आॅनलाइन नोंदणी तसेच अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन १ जुलैपासून कॅप राउंडची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. जमनालाल बजाज महाविद्यालयाला ११ जुलै २०१४ रोजी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला. त्यामुळे तेथील आतापर्यंतचे प्रवेशाच्या जागांचे गणित हे स्वायत्त महाविद्यालयाप्रमाणे ठरत होते. मात्र ११ जुलै २०१९ रोजी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज महाविद्यालयाची स्वायत्ततेची मुदत संपलीे. महाविद्यालयान स्वायत्ततेसाठी आवश्यक कागदपत्रे आपण तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सादर केल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे सर्व हक्क तंत्रशिक्षण संचालनालयाकडे असून तेच त्याबाबतीत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.यामुळे बजाज महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या जागा मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील जागांच्या समीकरणाप्रमाणे भरण्यात येणार असून तसे प्रवेशाच्या जागांचे गणितही जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र आम्हाला अद्याप स्वायत्तता नसल्याने आम्ही मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत प्रवेश प्रक्रिया राबवीत असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाकडेही याबाबत विचारणा केली असता हा पूर्णपणे महाविद्यालयाच्या अखत्यारीतील निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवेश अलॉट झालेल्या जागेवर विद्यार्थ्यांना १९ ते २१ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करायचे आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.>निर्णय तंत्रशिक्षण संचालनालय घेणारप्रवेशासंदर्भात सर्व प्रक्रिया आणि निर्णय हे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून घेण्यात येत आहेत. स्वायत्तता मान्यतेच्या प्रक्रियेसंदर्भात आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता ही संचालनालयाला करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशासंदर्भातील सर्व निर्णय आणि त्याबाबत उत्तरे संचालनालय देईल.- कविता लघाटे, संचालिका, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट