एमबीए, एमएमएस प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:56 AM2019-08-04T02:56:23+5:302019-08-04T02:56:39+5:30
पहिल्या फेरीतील केंद्रीभूत प्रक्रियेतील जागावाटप रद्द
मुंबई : ३० जून रोजी सुरू करण्यात आलेली एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाची आतापर्यंतची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली असून ती नव्याने राबविली जाणार असल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीकडून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसंबंधित नवीन
वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. याआधीची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आल्यासंदर्भातील परिपत्रक विद्यार्थी, पालकांसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदा एकूण ३७ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. सीईटी सेलच्या अंतर्गत तंत्रशिक्षण विभागाकडून ३० जून रोजी एमबीए, एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन सुरू करण्यात आली. त्यानंतर १७ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरलेल्या अर्जानुसार पहिल्या फेरीतील जागांचे वाटपही करण्यात आले. पहिल्या फेरीदरम्यान २२,५१४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. दरम्यान, उच्च न्यायालयात जागांसंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली होती.
जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज, मुंबई या संस्थेसाठी जागावाटप करताना संस्थेचा दर्जा स्वायत्त ग्राह्य धरून महाराष्ट्र राज्यातील जागांचे राज्यस्तरीय ८५ टक्के जागा विचारात घेऊन प्रवेश करण्यात यावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर १७ जुलै रोजी करण्यात आलेले प्रथम फेरीचे जागावाटप प्रवेश प्रक्रिया समिती आणि सीईटी सेलकडून रद्द करण्यात आले आहेत.
आजपासून आॅनलाइन नोंदणी
एमबीए आणि एमएमएस प्रवेश प्रक्रियेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ४ आणि ५ आॅगस्ट रोजी आॅनलाइन नोंदणी करायची आहे. कॅप राउंडची १ ची तात्पुरती गुणवत्ता यादी ७ आॅगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केंद्रांवर ८ ते १० आॅगस्ट दरम्यान रिपोर्र्टिंग करणे आवश्यक आहे. त्याच दरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांची निवड झालेल्या संस्थेत प्रवेशासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करून आपले प्रवेश निश्चिती
करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
संस्थांमधील कॅप राउंड
२ साठीच्या रिक्त जागांची यादी १२ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. कॅप राउंड २ साठीची गुणवत्ता यादी १६ आॅगस्ट रोजी, तसेच कॅप राउंड ३ साठीची गुणवत्ता यादी २३ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.