लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी होऊन मे महिन्यात निकालही जाहीर झाला, मात्र त्यानंतर सीईटी सेलने प्रवेशाबाबतीत काहीच सूचना न दिल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीच हालचाल नसल्याने विद्यार्थी सीईटी सेलकडून यासंदर्भातील सूचना केव्हा जाहीर होणार, असे प्रश्न उपस्थित करीत आहेत.
गेल्या १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रांवर ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेत ४ विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळविणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिली सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये सुमारे ३६ हजार ७६५ जागा आहेत. या जागांवर सीईटीत मिळालेल्या मेरिट गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना काहीच माहिती दिली जात नसल्याने संभ्रम आहे. तर सीईटी सेलने अद्याप जागांसाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात सरकारनेही दुर्लक्ष केले आहे. प्रवेशाचे नियम आले आहेत, मात्र प्रवेश कधी सुरू करणार तसेच नवीन जागा मान्यता आदीबाबतही काहीच हालचाली सीईटी सेलकडून झालेल्या नसल्याने प्रवेश रेंगाळत असल्याबाबत विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
एआयसीईटीच्या सूचना कागदावरच
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एमबीए, पीजीडीएएम अभ्यासक्रमांना कोणत्याही एका प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी पारदर्शी पद्धतीने गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना एआयसीईटीने दिल्या आहेत. मात्र अद्याप सीईटी सेलकडूनच प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील काहीही सूचना नसल्याने या सूचना कागदावरच राहिल्या आहेत.