मुंबई : दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या घाटकोपर येथील उच्चशिक्षित अजित दत्तात्रय डुकरे (वय २९) याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जुहूच्या समुद्रकिना-यावर त्याचा मृतदेह आढळला असून, नैराश्येपोटी हे कृत्य केल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. एमबीए असलेल्या अजितने सुसाइड नोटमध्ये स्वत:चा उल्लेख ‘आयुष्य जगण्याचे स्किल नसलेल्या एका पुस्तकी किड्याचा अंत’ असा केला आहे.घाटकोपरच्या इंदिरानगरमध्ये आई, वडील आणि भावंडांसमवेत राहात असलेला अजित मालाडमध्ये एका फायनान्स कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला होता. अजित शाळेत नेहमी पहिला यायचा. शिक्षण, अभ्यासातच व्यस्त राहात असल्याने त्याचे फारसे मित्रही नव्हते. घरच्या मंडळींमध्येही तो फारसा मिसळत नसे.आईवडील पुण्यातील त्यांच्या जुन्नर या गावी गेले होते. त्यामुळे घरी अनिल आणि अजित हे दोघेच होते. गुरुवारी अजित आॅफिसला जाण्यासाठी निघाला. मात्र घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या भावाने घाटकोपर पोलीस ठाण्यात अजित बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. शुक्रवारी जुहू चौपाटीवर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्याकडील पाकिटातील लोकलच्या पासवरून त्याची ओळख पटली. याबाबत जुहू पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.‘अन्या, बाळा सांभाळ रे आता सगळं..!’पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा अजितच्या आॅफिसच्या बॅगमध्ये दोन पानांची सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये त्याने २८ वर्षांची घुसमट लिहून ठेवली होती. त्यात लहान भाऊ अनिल याला उद्देशून ‘अन्या, बाळा सांभाळ रे आता सगळं’ असे भावनिक आवाहन केले आहे.अजितने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आई, वडील, भावंडे आणि भाच्यांची माफी मागितली आहे. ‘मी नेहमी तुसडेपणे, गर्विष्ठपणे वागल्याने माफी मागण्याच्याही लायकीचा नाही. एमबीएची डीग्री घेतली. मात्र, आयुष्य जगण्यासाठीचे स्किल शिकलो नाही, याबाबत खंत वाटते. त्यामुळे जलसमाधी घेत आहे, एका पुस्तकी किड्याचा अंत होत आहे,’ असा मजकूर त्यामध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे पत्र वाचून पोलिसांच्याही डोळ्यांत अश्रू आले.
एमबीए तरुणाची नैराश्यातून आत्महत्या; स्वत:ला ‘पुस्तकी किडा’ संबोधून कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:25 AM