राज्यात एमबीबीएस प्रवेश फुल्ल तर बीडीएस प्रवेशाच्या २०८ जागा रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 01:43 AM2019-09-18T01:43:34+5:302019-09-18T01:43:59+5:30
राज्यातील वैद्यकीय (एमबीबीएस) व दंतपदवी (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अनुक्रमे १२ आणि १५ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली
मुंबई : राज्यातील वैद्यकीय (एमबीबीएस) व दंतपदवी (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अनुक्रमे १२ आणि १५ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली असून एमबीबीएस प्रवेशासाठीच्या जागा यंदा फुल्ल झाल्या असून बीडीएसच्या काही जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. राज्यात बीडीएस प्रवेशाच्या यंदा तब्बल २०८ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये १५ टक्के एनआरआय कोट्यातीलच ६७ जागा रिकाम्या राहिल्याचे समोर आले आहे.
राज्यातील शासकीय, शासन अनुदानित तसेच महापालिका, वैद्यकीय व दंतपदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलच्या मार्फत राबिवण्यात आले. यंदा शासकीय, अनुदानित, महानगरपालिका महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण ३६७२ तर बीडीएसच्या २८७ जागा उपलब्ध होत्या. त्यातील एमबीबीएसच्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून बीडीएसच्या ६२ जागा रिक्त आहेत. सोबतच खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या राज्यांतर्गत असलेल्या १३५ जागा भरल्या गेल्या आहेत तर बीडीएसच्या ७३३ जागांमधील ६५४ जागा भरल्या असून ७९ जागा रिक्त आहेत. या महाविद्यालयात असणाऱ्या एनआरआय कोट्यासाठी एमबीबीएसच्या सोडण्यात आलेल्या २८२ पैकी २७७ जागा भरण्यात आल्या असून ५ जागा रिक्त आहेत. तसेच बीडीएसच्या ३१६ जागांपैकी २४९ जागांवर प्रवेश दिले असून ६७ जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.
एमबीबीएस व बीडीएसच्या तीन फेºया, त्यानंतर मॉप अप फेरी घेण्यात आली होती. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबले होते. विद्यार्थ्यांसाठी सीईटी प्राधिकरणाकडून प्रवेशांना मुदतवाढही देण्यात आली.
>प्रवेशाची आकडेवारी
शासकीय अनुदानित व महानगरपालिका महाविद्यालये
अभ्यासक्रम प्रवेश रिक्त
एमबीबीएस ३६७२ ०
बीडीएस २२५ ६२
खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालये राज्यांतर्गत प्रवेश (८५%)
एमबीबीएस १३५ ०
बीडीएस ६५४ ७९
एनआरआय कोटा
एमबीबीएस २७७ ०
बीडीएस १४९ ६७