मुंबई - राज्यात यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कटऑफमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे ‘सीईटी’च्या पहिली गुणवत्ता यादीवरून आता स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये शासकीय कॉलेजांमधील प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कटऑफ यंदा ६४२ गुणांपर्यंत वधारला असून, विविध प्रवर्गांतील गुणांमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा एमबीबीएसच्या प्रवेशासाठी राज्यात मोठी चुरस राहणार असल्याचे चित्र आहे.
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५५ कॉलेजांतील ७,४११ जागांवरील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जात आहे. यंदा प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी तब्बल ३६,६९९ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. पहिल्या फेरीत यातील ७,३६० जागांचे वाटप सीईटी सेलने केले असून, त्याची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये यंदा शासकीय कॉलेजांसह खासगी कॉलेजांचाही खुल्या प्रवर्ग, ओबीसी, एसईबीसी यांच्यातील कटऑफमध्ये काही गुणांचाच फरक असल्याचे दिसत आहे.गेल्यावर्षी शासकीय कॉलेजांमध्ये खुल्या वर्गाचा कटऑफ ५८७ गुणांचा होता. तो यंदा ६४२ पर्यंत पोहोचला आहे. तसेच ओबीसी प्रवर्गाचा ६३८, मराठा समाजासाठी नव्याने तयार केलेल्या एसईबीसी प्रवर्गासाठी ६३५, तर एससी प्रवर्गाचा कटऑफही ५६२ एवढा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासगी कॉलेजांतील खुल्या प्रवर्गाचा कटऑफ यंदा ६०२ एवढा आहे. येथील ओबीसी प्रवर्गाचाही कटऑफ तेवढाच आहे. साहजिकच खासगी कॉलेजांमध्येही प्रवेशासाठी मोठी चुरस दिसून येत आहे.