योगेश जंगम
मुंबई : हार्बर मार्गावरील शिवडी रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमबीपीटी) अखेर तयार झाली आहे़ एमबीपीटीने याचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला आहे़ केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर पुनर्विकास म्हाडा करणार की एमबीपीटी स्वत: करणार यावर निर्णय घेतला जाईल़ यामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेला चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शिवडी येथे एमबीपीटीच्या २.५२ हेक्टर जागेवर एकूण बारा बीडीडी चाळी आहेत. या चाळींमध्ये सुमारे ९६० गाळे आहेत. वरळी, ना़म़ जोशी मार्ग व नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला़ त्याची प्रक्रिया सुरू केली़ यासोबतच शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते़ मात्र या बीडीडी चाळी एमबीपीटीच्या भूखंडावर असल्याने त्यांची मंजुरी बंधनकारक होती़ तसा प्रस्ताव म्हाडाने एमबीपीटीकडे पाठवला होता़ हा प्रस्ताव एमबीपीटीकडे प्रलंबित होता़ अखेर या प्रस्तावाला एमबीपीटीने हिरवा कंदील दाखवला आहे़ केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे़ तेथून मंजुरी मिळाल्यानंतर पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होईल़ या पुनर्विकासातून निर्माण होणारी घरे रहिवाशांना देऊनसुमारे पाचशे अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. ही घरे मध्यमआणि उच्च गटातील असणारआहेत. यासह या परिसरामध्येमंदिरे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे आणि समाजमंदिरे यांनाही पुनर्विकासामध्ये सामावून घेतले जाणार आहे.म्हाडाने आमच्याकडे शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अहवाल पाठवला होता, हा अहवाल आम्ही पुढील मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. हा भूखंड आमचा असल्याने केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा पुनर्विकास प्रकल्प आम्ही करायचा का म्हाडामार्फत करायचा ते ठरवणार आहोत. केंद्राकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव येईल़ यानंतर आमची एक संयुक्त बैठक पार पडेल़ हा पुनर्विकास प्रकल्प आम्ही करायचा का म्हाडामार्फत करायचा ते आम्ही ठरवणार आहोत.- संजय भाटिया,अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट