वाढलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एमसीए सीईटी परीक्षा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:40 PM2020-04-15T15:40:20+5:302020-04-15T15:41:00+5:30
३० एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित
मुंबई : देशातील वाढवलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिल २०२० रोजी घोषित करण्यात आलेली एमसीए सीईटी पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील सूचना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली असून पुढील सुधारित तारखेसाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधी संचारबंदीमुळे आणि आता वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एमसीएस सीईटी पुढे ढकलण्यात आली असल्याची ही दुसरी वेळ आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सीईटी परिक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते म्हणून २८ मार्च रोजी होणारी एमसीए सीईटी पुढे ढकलण्याचा आणि ३० एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले होते. मात्र कोरोनाचा राज्यातील व देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन कालावधी वाढवून तो ३ मे करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सीईटी परीक्षा घेणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सीईटीच्या नोंदणीला मुदतवाढ द्यावी : इंजिनीअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी एमएचटी - सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, विविध कारणांमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. सध्या सीईटी परीक्षा पुढे ढकलल्याने ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात यावा, ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी हुकली त्यांना आणखी एक मिळेल अशी मागणी मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य वैभव थोरात, प्रदीप सावंत , शीतल देवरुखकर शेठ आदी सदस्यांकडून करण्यात आली आहे.