मुंबई : लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुनावल्यानंतर संलग्न राज्य संघटनांनीदेखील याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी कार्यकारिणी समितीची बैठक घेणार असल्याचे एमसीएचे खजिनदार नितीन दलाल यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मंगळवारी संध्याकाळी एमसीएत सध्या वर्चस्व असलेल्या बाळ म्हादळकर गटाच्या सदस्यांना लोढा शिफारशीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी रवी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी दलाल यांनी ही माहिती दिली.दखल घेण्याची बाब म्हणजे या वर्षी एमसीएची निवडणूक होणार असून, लोढा समितीच्या शिफारशीनुसार कोणतीही व्यक्ती सलग दोन निवडणुका लढवू शकत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी म्हादळकर गटाने आपल्या सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचीही चर्चा रंगत आहे. ‘इतर राज्य संघटनांसह एमसीएच्या वतीनेही लोढा शिफारशीबाबत असलेल्या समस्यांची लेखी स्वरूपात माहिती आम्ही बीसीसीआयकडे दिली आहे. बीसीसीआय व लोढा समितीची बुधवारी बैठक झाल्यानंतर गुरुवारी एमसीएच्या कार्यकारिणी समितीची बैठक होईल. मंगळवारी केवळ म्हादळकर गट सदस्यांना कल्पना देण्यासाठी बैठक घेण्यात आली होती,’ असे दलाल यांनी या वेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
‘एमसीए’ची बैठक गुरुवारी होणार
By admin | Published: January 11, 2017 4:10 AM