महेश झगडे, माजी प्रधान सचिव, अन्न व औषध प्रशासन विभाग
मॅकडोनाल्ड आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील वादावरून काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात. जनतेला गुणवत्तापूर्ण आणि कोणतीही फसवणूक न होता अन्नपदार्थ उपलब्ध होतील, ही अन्न व औषध प्रशासनाची वैधानिक जबाबदारी आहे. विशेषत: हे अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते कायद्याप्रमाणे तयार केलेले आहेत किंवा नाहीत आणि नसल्यास ते ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वीच प्रशासाने कारवाई केली पाहिजे, असा कायदा आहे.
मॅकडोनाल्डच्या बाबतीत ही कारवाई म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ अशा स्वरूपाची आहे. अन्न आणि औषध प्रशासन याबाबतीत अपयशी ठरलेले आहे. त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत असे प्रकार राज्यात घडत राहतील. अन्न आणि औषध प्रशासन त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहे किंवा नाही, याचा आढावा घेऊन वचक ठेवण्यात राज्य शासनदेखील कमी पडत असेल तर राज्य सरकारही गैरप्रकाराला तितकेच जबाबदार आहे.
एफडीएच्या कारवाया तोंडदेखल्या आहेत की, विचारपूर्वक केलेल्या आहेत हा आणखी एक गहन विषय. वास्तविक ज्या अन्नपदार्थांचे सर्वांत जास्त सेवन केले जाते, त्यांची गुणवत्ता राखणे आणि त्यात भेसळ होऊ नये म्हणून दक्ष राहण्याची आद्य जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यातही, आरोग्यास आणि जीवितास घातक पदार्थ अन्नामधून ग्राहकांवर थोपवले तर जात नाहीत ना? याची दैनंदिन काळजी घेतली गेली पाहिजे.
दुधातील भेसळीचे काय?
तान्ह्या बाळापासून आबालवृद्धांपर्यंत दररोज १४ कोटी जनता दुधाचे सेवन करते. ते नैसर्गिक असल्याचा आणि अपायकारक रसायनांपासून तयार करून ते भयानक व्याधी निर्माण करणारे तर नाही ना? यावर किती कारवाया केल्या? हे तपासणे महत्त्वाचे आहे. रासायनिक दुधाची बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. भेसळ दुधामुळे यकृत, हृदय, मूत्रपिंड, मेंदू आदी अवयवांवर भयानक परिणाम होऊ शकतात किंवा कर्करोगसुद्धा होऊ शकतो. दूध उत्पादकांकडून किती दूध संकलित केले आणि तितकेच दूध विक्री होते का? यावर लक्ष ठेवण्यासाठी वर्षातून दोनदा मोठ्या दूध उत्पादकांना अन्न व औषध प्रशासनाकडे विवरणपत्र दाखल करण्याचे नियमाने बंधन केलेले आहे. मात्र, असे विवरणपत्र दाखल केले जाते किंवा नाही; दाखल केले असल्यास त्यामध्ये काही काळेबेरे दिसून आले किंवा कसे? याबाबत अन्न व प्रशासनाकडून काय कारवाई होते? हे सर्वसामान्यांनाही समजणे गरजेचे आहे. यामधून अवैधपणे पैसा मिळवणे ही गुन्हेगारी स्वरूपाची बाब आहे. हे दुहेरी गुन्हेगारीचे प्रकार थांबण्यासाठी प्रशासनाने काय कारवाई केली, हे नागरिकांना माहीत होत नाही. तेल, पिठामधील भेसळ या दैनंदिन स्वरूपाच्या अन्नपदार्थांतील भेसळीमुळे आरोग्यावर विघातक परिणाम होतात व त्यावर अन्न व औषध प्रशासन काय करते? याबाबत जनता अनभिज्ञ असते.
प्रक्रिया केलेले अन्न आणि...
प्रक्रिया केलेले अन्न वाढीस लागले असून, त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. त्याची सुरुवात अन्नाच्या जाहिरातीपासून होते. अन्नामुळे काय होऊ शकते हे सर्वसामान्यांच्या मनावर चुकीच्या पद्धतीने बिंबविण्याबाबत कायद्याने जाहिरात करता येत नाही. अन्नपदार्थांमध्ये काय तत्त्व आहेत, केवळ ते जाहिरातीमध्ये देणे मान्यताप्राप्त आहे. अनेक जाहिरातींमध्ये तेल, लहान मुलांसाठीची पेये आदींमध्ये ते पदार्थ किती चांगले परिणाम करतात, हे सांगितले जाते. संबंधित चुकीच्या जाहिरातींवरसुद्धा कारवाई अपेक्षित आहे.