‘एफडीए’ने फेटाळला मॅकडोनल्ड्सचा दावा; चीजचा अस्सलपणा अहवालावर राहणार अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:42 PM2024-03-06T14:42:30+5:302024-03-06T14:44:15+5:30
मुंबईसह राज्याच्या मॅकडोनल्ड्समधून एफडीएने घेतलेल्या अन्न नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे.
मुंबई : अहमदनगरच्या मॅकडोनल्ड्समधील खाद्यपदार्थांमध्ये चीजसदृश पदार्थ किंवा पर्यायी पदार्थाचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर चिंतीत झालेल्या मॅकडोनल्ड्सने अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाकडून स्वतःच खाद्यपदार्थांची तपासणी करून ‘१०० टक्के अस्सल चीज’चा वापर करत असल्याचा दावा केला आहे. मात्र, हा दावा अन्न व औषध प्रशासन विभागाने फेटाळल्याने साशंकता व्यक्त होत आहे.
मुंबईसह राज्याच्या मॅकडोनल्ड्समधून एफडीएने घेतलेल्या अन्न नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने याबाबत आमच्याशी कुठलाही अधिकृत संवाद साधला नसल्याचेही एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले. या प्रकरणी एफडीएकडून होणारे विश्लेषण हे अधिक पारदर्शी आहे. सध्या मॅकडोनल्ड्सकडून केलेला दावा म्हणजेच त्यांनी स्वतंत्रपणे पाठविलेले अन्न नमुने व त्यासंदर्भातील प्रक्रिया आहे. याविषयी एफएसएसएआय संकेतस्थळावरही कोणतीही नोंद नाही, त्यामुळे मॅकडोनल्डने केलेल्या दाव्याची पुष्टी अन्न व औषध प्रशासन करत नाही, असेही एफडीएचे दक्षता विभागाचे सहायक आयुक्त विलास इंगळे यांनी सांगितले.
ग्राहकांच्या जीवाशी खेळ थांबविण्यासाठी चाचपणी
अहमदनगर येथील मॅकडोनल्ड्समध्ये पदार्थांच्या घटकांमध्ये चीजऐवजी चीजसदृश पदार्थ (ॲनालॉग) वापरल्याचे उघड झाले. त्यानंतर एफडीएने मॅकडोनल्ड्ससह राज्यातील केएफसी, बर्गर किंग, चायोज, डोमिनोज, बार्बेक्यू नेशन व अन्य फास्ट फूड कंपन्यांतील अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.
फास्ट फूड कंपन्यांकडून महागडे दर आकारूनही ग्राहकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठी एफडीएकडून चाचपणी करण्यात येत आहे.
एफएसएसएआयकडून क्लिनचीट
मॅकडोनल्ड्सचे पुरवठादार उत्पादनांची चाचणी करतात. ही चाचणी वर्षातून दोनदा स्वतंत्र एनएबीएल अधिमान्यताप्राप्त अन्न परीक्षण प्रयोगशाळांमध्ये घेतली जाते. या उत्पादनांमध्ये जागतिक पातळीवरील पुरवठादारांकडून खरेदी केलेले अस्सल चीज वापरले जाते. एफएसएसएआयकडून मिळालेल्या क्लीनचिटमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.