एमडीएफएची दिमाखदार बाजी
By admin | Published: February 6, 2017 01:19 AM2017-02-06T01:19:55+5:302017-02-06T01:19:55+5:30
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना संघाने (एमडीएफए) उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना यजमान पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचा (पीडीएफए) १-० असा पराभव केला.
मुंबई : मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना संघाने (एमडीएफए) उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना यजमान पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचा (पीडीएफए) १-० असा पराभव केला. या विजयासह मुंबईकरांनी १८ वर्षांखालील आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद उंचावले. कामरान अन्सारीने विजेत्या मुंबईचा एकमेव गोल साकारला.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) वतीने ढोबरवाडी येथील पीडीएफएच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईकरांनी वर्चस्व राखले. संथ सुरुवात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी बचावात्मक पवित्रा घेत एकमेकांच्या खेळाचा अंदाज घेतला. मात्र, घरच्या मैदानाचा फायदा घेत पुण्याच्या एडविन फलेरो, रोमॅरिओ नाझरेथ यांनी आक्रमक चाली रचत पुण्याला आघाडीवर नेण्याची संधी निर्माण केली. परंतु, कसलेल्या मुंबईकरांनी भक्कम बचावाच्या जोरावर पुण्याचे प्रयत्न अपयशी ठरवले. यामुळे मध्यंतराला सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला.
यानंतर, मात्र वर्चस्व राहिले मुंबइचे. अन्सारीने आक्रमणाची सुत्रे आपल्याकडे घेताना पुण्याच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली आणि ५८ व्या मिनिटाला शानदार गोल करुन मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, मुंबईकरांनी
भक्कम बचाव करताना हीच
आघाडी अखेरपर्यंत कायम राखत विजेतेपदावर आपले नाव कोरले. (क्रीडा प्रतिनिधी)