- प्रेमानंद गज्वीलवकरच होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची एकमताने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने निवड केली. त्यानिमित्त अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत आपण संमेलन सोडून रंगभूमीसाठी काय करणार आहोत? या संमेलनाकडून काय अपेक्षा आहेत? नाट्यपरिषदेच्या नव्या फळीच्या पदाधिकाºयांसह आपण काय नवीन देऊ शकतो? याविषयी कॉफी टेबल अंतर्गत प्रेमानंद गज्वी यांची ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजय परचुरे यांनी घेतलेली मुलाखत.>या अध्यक्षपदाकडे तुम्ही कसे बघता?नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद हा काटेरी मुकुट आहे, हे मी अजिबातच मानत नाही. उलट आत्तापर्यंत मी जे लिखाण केले, रंगभूमीला जी काही नाटके दिली, लेखन दिले त्यामुळे अध्यक्ष म्हणून निवड होणे ही मला मिळालेली पोचपावती आहे, असे मी मानतो. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने केलेली निवड मी माझा सन्मान समजतो. नाट्यपरिषदेनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, तुमच्या मदतीने आम्हाला काही कामे मराठी रंगभूमीसाठी महाराष्ट्रभर करायची आहेत. ती मी इमानेइतबारे करणार आहे. माझ्याकडच्या काही संकल्पना मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे. मी असे म्हटले की, मी वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात २० नाट्यलेखन कार्यशाळा घेईन आणि त्याला जर नाट्यपरिषदेने योग्य तो प्रतिसाद दिला नाही, तर मात्र हा अध्यक्षपदाचा मुकुट मला काटेरी वाटायला लागेल, तेव्हा जबाबदारी नाट्यपरिषदेची आहे.तुम्ही मूळचे नागपूरचे. हे संमेलन होण्यासाठी नागपूर शहरही स्पर्धेत आहे. त्याविषयी काय सांगाल?संमेलन मुळात नागपुरातच होईल, अशी मला दाट शक्यता वाटते. मात्र, इतर शहरेही या संयोजनाच्या स्पर्धेत आहेत. माझ्यासाठी नागपूरला संमेलन झाले तर चांगलेच आहे. मात्र, या संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी नाट्यसंमेलन झाले, तर त्याला माझा विरोध नाही. लेखकाला मुळात कोणत्याच जागेची बंधने नसतात. त्यामुळे कुठेही संमेलन झाले, तरी मला त्याने फरक पडत नाही.प्रसाद कांबळीच्या टीममधील पदाधिकारी तरुण आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने काम करणार आहात?मुलुंडचे नाट्यसंमेलन मी जवळून पाहिले. मला प्रसाद कांबळीचे आणि त्याच्या नवीन टीमचे एक वैशिष्ट्य जाणवले, जे मला प्रामुख्याने इथे नमूद करावेसे वाटते. नाट्यसंमेलन म्हटले की, त्यात राजकीय रथी-महारथींची रेलचेल हा दरवर्षीचा शिरस्ता ठरलेला असतो, पण मुलुंडच्या नाट्यसंमेलनात प्रसादने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना फार हुशारीने सामावून घेतले होते. त्यामुळे असे कधीच वाटले नाही की, या संमेलनात या पक्षाचा पगडा फार जास्त होता. संमेलनातील कार्यक्रमांनाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यांची टीम सगळी टीम तरुण आहे, आधुनिक विचारसरणीची आहे. या टीमला खरंच काहीतरी मनापासून रंगभूमीसाठी करायचे आहे. या आधी जे कधीच घडले नाही, ते या टीमला घडवून आणायचे आहे आणि ते त्यांच्या एकंदरीतच कामावरून जाणवते. त्याच्या कारकिर्दीला अजून ४ वर्षे आहेत. त्यांनी कारभार स्वीकारून अजून १ वर्षही झाले नाहीये. त्यामुळे त्यांच्या कामाविषयी मूल्यमापन करणे आत्ताच खूप लवकर होईल. या धडपड्या मुलांना चांगले काही करायचे असेल, तर त्यांना त्यांची योग्य ती वेळ देणे फार गरजेचे आहे. माझी आणि नाट्यपरिषदेच्या पदाधिकाºयांची जेव्हा आता ९९व्या नाट्यसंमेलनाच्या रूपरेषेविषयी पहिली बैठक होईल. त्यात मी त्यांना पहिलेच सांगणार आहे की, हे नाट्यसंमेलन तुझे की माझे नसून हे आपले ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन आहे.त्याचबरोबर, रंगभूमीवर असणारे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांचेही विचार घेणे महत्त्वाचे आहे. मला असे वाटते, माझी आत्तापर्यंतची जेवढी रंगभूमीवरील कारकिर्द आहे, माझ्या बुद्धीला जेवढे काही करता येईल, जितके काही कळते, त्यानुसार मी माझे १०० टक्के या नाट्यसंमेलनाला देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न नक्कीच करीन. त्याचबरोबर, या मुलांनी सुचविलेले मुद्दे, त्यांच्या संकल्पना ही तितक्याच विचाराधीन घेणे गरजेचे आहे. मला नेहमी वाटत आले आहे की, नवीन पिढीतील या मुलांना तंत्रज्ञानाचे उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे आणि नाट्यपरिषद व नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून आम्हाला हातात हात घालून रसिकमायबाप प्रेक्षकांसाठी काय नवीन देता येईल, याचा संपूर्णतहा विचार करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आम्ही भविष्यात वाटचाल करू, असे मला वाटते आहे.तुमची ‘किरवंत’प्रमाणेच ‘घोटभर पाणी’ ही एकांकिकाही खूप गाजली. तिचे सुमारे ३,००० प्रयोग झालेत, पण असे असताना छावणी नाटकाला मात्र निर्माताही मिळत नाही, असा विरोधाभास का होतो?खरे तर या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. ३,००० प्रयोग झाले ‘घोटभर पाणी’चे. याचे कारण दोनच पात्रे, पण व्यक्तिरेखा १२. प्रत्येक नटाच्या वाट्याला ३५ मिनिटांच्या काळात ६-६ व्यक्तिरेखा करायला मिळतात. गावाकडील शोषित समाजाच्या वाट्याला साधे पाणीही मिळू नये, हा प्रश्न. एकूण भ्रष्टाचार-बनवेगिरी वर्तमान ते रामायण काळ हा मोठा कालखंड उभे करणारे हे मुक्तछंदनाट्य आहे.एक गाव एक पाणवठा ही चळवळ. तिच्यातला फोलपणा. संपूर्ण क्रांतीचा नारा. त्यातील नालायकपणा. अनेक गोष्टी मानवी जीवनाला व्यापून टाकणाºया असल्यामुळे हे यश मिळाले असावे. महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धेत ही एकांकिका झाली. पुरस्कारांची लयलूट झाली. सामाजिक प्रश्नाचे भान असणाºया नाट्य तरुणांनी, एकेका ग्रुपने शंभर-शंभर प्रयोग केलेत. नागपूर जिल्ह्यातील कन्हानची अभिनव संस्था किंवा मालाडची प्रयोग. ‘घोटभर पाणी’ने मला मोठे नाव दिले. इतके की घोटभर पाणी म्हणजे प्रेमानंद गज्वी आणि प्रेमानंद गज्वी म्हणजे घोटभर पाणी, पण तुम्ही छावणीचा विषय काढलात म्हणून सांगतो. या नाटकाला आणण्यासाठी निर्माते तयार नाहीत, हे खरे आहे. कारण आजचा निर्माता हा व्यवसायिक ध्येयधोरणे बघून संहिता निवडणारा आहे आणि ‘छावणी’ नाटक हे सद्यपरिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारी संहिता आहे. मला निर्मात्यांवर कोणताही राग नाही. एका कलाकृतीवर लाखोने पैसा लावणारा निर्माता मुळातच विनोदी नाटकांच्या, संहितेच्या जास्त प्रेमात असतो. कारण त्यांना त्या नाटकातून बक्कळ पैसा मिळतो, असा रंगभूमीवरचा एक समज आहे, पण छावणी हे नाटक या सगळ्याला एक छेद ठरू शकते. कारण मी हे नाटक ज्या-ज्या लोकांसमोर वाचले आहे. त्यांनी या नाटकातील विषयाचे जाहीर कौतुक केलेय. अशा प्रकारची नाटके रंगभूमीवर आली पाहिजेत, असे त्याचेही मत आहे. मात्र, असे असूनही निर्माता ‘छावणी’ करण्यासाठी पुढे येत नाही, हे त्यांचे दुर्दैव आहे माझे नाही.मुळात मला व्यावसायिक म्हणून वाट्टेल ते लिहिण्याचा तिटकारा आहे. जे माझ्याकडून होऊ शकत नाही, त्याचा मी अट्टहास करत राहणे हे मुळातच चुकीचे आहे आणि त्यामुळेच मी माझ्या लेखनशैलीच्या पद्धतीने नेहमी लिहीत आलोय व मी पुढेही त्याच पद्धतीने नेहमीच लिहीत राहणार आहे.मला प्रामुख्याने असे वाटते की, माझ्याप्रमाणेच ५ ते ६ लेखक याच पद्धतीने आणि याचप्रमाणे लिहू लागले व मराठी नाट्यनिर्मात्यांनी अशा प्रकारच्या वेगळ्या वाटेवरच्या संहितांना रंगभूमीवर आणले, तर नक्कीच एक वेगळ्या प्रकारची नाटके मराठी नाट्यरसिक पाहू शकतील. मुळात सध्याचा नाट्यरसिक हा चोखंदळ आहे. त्यांना नवे आणि वेगळ्या वाटेवरचे विषय हवेत, पण निर्माते जोपर्यंत पुढे येत नाहीत, तोपर्यंत ‘छावणी’ हे नाटक रसिकांपर्यंत येणे कठीण आहे आणि ही सत्यपरिस्थिती आहे, जी आपल्याला मान्य करावीच लागेल.बोधी नाट्य परिषदेची स्थापना करून, गेल्या दहा वर्षांत २५ नाट्यलेखन कार्यशाळांचे आयोजन करून, नवे नाटककार शोधलेत. याचे तुम्हाला नेमके फलित काय मिळाले?बोधी नाट्य परिषदेची स्थापना २२ नोव्हेंबर, २००३ साली झाली, हे दृष्यरूप झाले. गेली चाळीस वर्षे मानवी जीवन समजून घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो, अगदी तेव्हापासून काही प्रश्न मला छळत होते. कलावंत जन्मावा लागतो की घडवावा लागतो? कोणताच माणूस ज्ञानी म्हणून जन्मत नाही, तर आपल्या अंगभूत अभ्यासाने विकास पावत असतो. या भूमीतले सर्वात मोठे उदाहरण म्हणजे बुद्ध. वैदिक ब्राह्मणी पद्धतीने त्याने माणूस दु:खी का, हे शोधून पाहण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर सापडले नाही. तेव्हा त्याने आपल्या स्वतंत्र प्रयत्नाने मानवी दु:खाचे मूळ शोधले. ते मूळ होते तृष्णा. ही तृष्णा दूर झाली, तरच माणूस सुखी होऊ शकतो, हे सिद्ध केले आणि अवगत ज्ञान दिले प्रथम त्या पाच वैदिक ब्राह्मणांना, जे पुढे पंचशिष्य म्हणून प्रसिद्ध पावले इतिहासात. मीही स्पष्ट सांगून टाकले पाहिजे, मी बुद्धानुयायी आहे. माझे गुरू दोन. एक डॉ. बी.आर. आंबेडकर, ज्यांनी मला बौद्ध धम्म समजून सांगितला आणि दुसरा गुरू अर्थातच बुद्ध, ज्याने मानवाने आपला मेंदू विवेकाने कसा वापरावा हे शिकविले. हे दोघे माझे गुरू नसते, तर मी बोधी नाट्य परिषद नसती स्थापन केली आणि जगत आलो असतो त्याच वादाच्या भोवºयात, कलेसाठी कला की जीवनासाठी कला? कला कलेसाठी नसते की नसते
माझ्यासाठी नाट्यसंमेलनाध्यक्षपद काटेरी मुकुट नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 6:29 AM