Join us

'मी पुन्हा येईन'... देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 2:11 PM

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर राज्यातील बड्या नेत्यांसह, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. मात्र, सकाळपासूनच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर, फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेंबाच्या स्मृतीस अभिवादन केले. मात्र, शिवसैनिकांच्या रोषाचा सामना यावेळी देवेंद्र फडणवीसांना करावा लागला.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं. त्यानंतर, दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास फडणवीस शिवतीर्थावर पोहोचले. मात्र, शिवतीर्थावरुन बाहेर पडताना, फडणवीस यांच्या गाडीला घेराव घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. शिवसैनिकांनी आपल्या मनातील राग घोषणाबाजीतून व्यक्त केली. शिवसेना-भाजपाची युती तुटल्याची भावना शिवसैनिकांनाही रुचली नाही. पण, यास जबाबदार नेमकं कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तरीही, शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी करत त्यांना टार्गेट केलं. फडणवीस यांनी स्मृतीस्थळावर उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. यावेळी, शिवसैनिकांकडून शिवसेना झिंदाबादचीही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, पंकजा मुंडे, विनोद तावडे, भाई गिरकर, भाई जगताप यांचीही उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडेंनी बाळासाहेबांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला बोलण्याचे टाळले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्वाभिमान आणि हिंदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिलाय. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, माजी मुख्यमंत्र्यांनी अलगदपणे शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवणच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी करून दिल्याचं दिसून येतंय.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाबाळासाहेब ठाकरेमुंबईभाजपा