चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना तुटपुंजी अर्थिक मदत; राज्य सरकारवर मच्छीमार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:50+5:302021-06-02T04:06:50+5:30

निकष बदलून पुनर्वसन करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या ...

Meager financial assistance to hurricane-affected fishermen; Fishermen angry over state government | चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना तुटपुंजी अर्थिक मदत; राज्य सरकारवर मच्छीमार नाराज

चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना तुटपुंजी अर्थिक मदत; राज्य सरकारवर मच्छीमार नाराज

Next

निकष बदलून पुनर्वसन करा,

अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची गेल्या शनिवारी २९ मे रोजी मालाड पश्चिम, मढ येथे तौक्ते चक्रीवादळाबाबत बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजी झालेल्या बैठकीत चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना तुटपुंजी अर्थिक मदत जाहीर करून त्यांच्या तोंडाला पाने पुसली. मच्छीमारांची राज्य व केंद्र सरकारने फसवणूक केली, असा आराेप करीत सरकारविराेधात मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. मच्छीमारांच्या मदतीचे कालबाह्य निकष बदलून त्यांचे आर्थिक पुनर्वसन करा अन्यथा येत्या १५ जून रोजी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे राज्य व केंद्र सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या झालेल्या बैठकीत राज्य व केंद्र सरकारला देण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

तौक्ते चक्रीवादळात ७ मच्छीमार मृत्यू-बेपत्ता आहेत, १५६ मासेमारी नौका जाळ्या व मासेमारी साधन सामग्रीसह नष्ट झाल्या आहेत. तर १०२७ नौकांचे कमीजास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या मच्छीमारांच्या ५ ते ४० लाखांच्या मासेमारी नौका पूर्ण निकामी झाल्या आहेत, त्यांना फक्त २५ हजार रुपये, दुरुस्तीसाठी १० हजार रुपये आणि जाळ्या पूर्ण नष्ट/दुरुस्तीसाठी ५ हजार रुपये अशी तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळले. वादळी पावसामुळे खळ्यांवर साठवून ठेवलेली सुकी मासळी, सुकविण्यास घातलेली मासळी वाहून गेली; तसेच मासळी विक्रेत्या महिलांकडील ताजी मासळी वाया गेली, याचा उल्लेखही नाही. यांचे पंचनामे केले नाहीत. किमान ५०० कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मत्यव्यवसाय मंत्री आणि इतर मान्यवरांना सदर माहिती २५ मे रोजी ईमेलद्वारे पाठविली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती व राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे कालबाह्य कायदे लागू करून तौक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना तुटपुंजी आर्थिक मदत राज्य व केंद्र सरकारने देऊ नये, अशी मागणी कृती समितीच्या मुंबई महिला संघटक उज्ज्वला पाटील यांनी केली. फयान वादळग्रस्त मुंबई महिला संकटग्रस्त मच्छीमारांना तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी १०० कोटी रुपये देऊन मासेमारी नौका पूर्ण निकामी झाल्या होत्या, त्यांच्या नौका, जाळ्या दुरुस्त केल्या हाेत्या. मासे विक्रेत्या, मासे सुकविणाऱ्यांना अर्थिक मदत केली होती. तशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या वतीने २५० कोटींची अर्थिक मदत करावी. तेवढीच मदत केंद्र सरकारकडून मिळण्यास सहकार्य करावे, अशी विनंती केली होती. परंतु मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली, असे लिओ कोलासो व किरण कोळी यांनी सांगितले.

* शिवसेनाप्रमुखांची आठवण झाली!

ताैक्ते चक्रीवादळानंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. सन १९९८ मधल्या वादळात मुंबईत मढ कोळीवाड्यात ३ व वेसावा कोळीवाड्यात २ नौका पूर्ण नष्ट झाल्या होत्या. त्या वेळेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री नारायण राणे यांना तत्काळ लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. मनोहर जोशी यांनी वेसावामध्ये व नारायण राणे यांनी मढ येथे येऊन मुख्यमंत्री निधीतून ६० हजार रुपयांची तत्काळ मदत दिली व पुनर्वसनही केले. मुंबईत ५० च्या वर मासेमारी नौका नष्ट झाल्या. परंतु शिवसेनेचा एकही नेता किंवा मंत्री फिरकला नाही, असा आरोप बैठकीत करण्यात आला.

...तर १५ जून रोजी राज्यभर आंदोलन पुकारणार

तौक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांच्या मासेमारी नौकांच्या पुनर्वसनासाठी बिगर यांत्रिक, एक, दोन व तीन सिलिंडर नौकांना ३ लाख रुपये, चार सिलिंडर नौकांना ५ लाख रुपये, सहा सिलिंडर नौकांना १० लाख रुपये, मृत्यू/बेपत्ता मच्छीमारांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये अर्थिक मदत करावी. मासळी सुकविणारे, मासळी विक्रेत्या महिलांना १० हजार रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी या वेळी नरेंद्र पाटील व किरण कोळी यांनी केली.

तसेच गुजरात राज्याप्रमाणे केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी. राज्य व केंद्र सरकारने येत्या आठवडाभरात भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा १५ जून रोजी राज्यभर महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

----------------------------------------

Web Title: Meager financial assistance to hurricane-affected fishermen; Fishermen angry over state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.