मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व नायर रुग्णालयाच्या हाजीअली येथील विद्यार्थी वसतिगृहात दोन वर्षांपासून कँटीनची व्यवस्था नाही. यामुळे सकस भोजनाअभावी येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ४०० ते ५०० विद्यार्थ्यांची आबाळ होत आहे. जे कँटीन आहे तेथे असुविधा असूनही विद्यार्थ्यांना न परवडणाऱ्या किमतीत सुविधा दिली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच निवासी डॉक्टर, रुग्णांचेही हाल होत आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, नायर वैद्यकीय महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आणि मार्ड अधिकाऱ्यांकडून वारंवार कँटीनबाबत आणि तेथील अपुऱ्या सुविधांबाबत तक्रारी करूनही कॉलेज कँटीन कमिटीकडून यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमानुसार महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना कँटीनसोबत जिम्नॅशियम आणि प्ले ग्राउंडसारख्या सुविधाही देणे आवश्यक आहे. मात्र, महाविद्यालयाच्या वसतिगृहाचा तळमजलाही तेथील स्थानिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिला जात असल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. महाविद्यालयीन प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर अखेर विद्यार्थ्यांनी युवा सेनेकडे याबाबत तक्रार केली आहे.
प्रशासनाचा मनमानी कारभार
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी आणि डॉ. सारिका पाटील यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या खाण्या-पिण्याच्या असुविधांबाबत जाब ही विचारला. मात्र, चर्चेअंती नगरसेवक नसल्यामुळे रुग्णालय प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याची माहिती युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. त्यामुळे ते आता यावर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आरोग्य डॉ. संजीव कुमार यांची भेट घेणार आहेत. याशिवाय प्रशासनाने वेळेत याची गंभीर दखल न घेतल्यास महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
कँटीमधील अन्नाचा दर्जा सुमार असूनही कँटीन कुठलीही सूचना न देता दिवसेंदिवस जेवणाचे शुल्क वाढवीत आहेत, तर कर्मचारी ऑर्डर घेण्यासाठी येत नसून ऑर्डर देण्यासाठी सतत आर्जव करावे लागते. ऑर्डर येण्यास ३० ते ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागतो. निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या जेवाणासाठीचा वेळ आधीच कमी असल्याने डॉक्टर वेळेवर वॉर्डात पोहोचू शकत नाहीत. कँटीनमधील परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. येथील भांडी नीट स्वच्छ केली जात नाहीत, तर अन्न अस्वच्छ, न धुतलेल्या आणि ओल्या ताटांतून वाढले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत, असे सांगण्यात आले.
हाजीअली येथील यूजीपीजी कँटीन बंद आहे, तर नायर रुग्णालय परिसरात चांगल्या दर्जाचे कँटीन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी, पुढील महिन्यात निविदा काढण्यात येणार असून, कारवाई केली जाईल.- डॉ. प्रवीण राठी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय