मुंबई :
गोवरवरील लस आपल्याकडे उपलब्ध असून, गेली अनेक वर्षे मुलांना ती दिली जात आहे. लसीची परिणामकारता आणि उपयुक्तता दिसून आली आहे. लस घेतल्यावर गोवर कुणाला होत नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे लहान बाळांना हा आजार झाल्यास त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. वेळप्रसंगी मृत्यू ओढवू शकतो. कोरोनाकाळात काही बालकांना ही लस न मिळाल्याचे हे परिणाम असू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सर्व बालकांना गोवराची लस दिलीच पाहिजे, असे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
गोवराच्या लसीकरणाकरिता मोठी मोहीम आयोजित केली जाते. त्या वेळी कुणी लस घेतली नाही याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र, काही पालक ही लस घेण्याकरिता बालकांना घेऊन आरोग्य केंद्रावर येत नाहीत; तर काही कोरोनाच्या काळात जन्मलेल्या बाळांना लस नंतर घेऊ, अशी कारणे देत लस घेणे टाळतात. त्यामुळे ज्या बाळांना लस घेतलेली नाही, त्या बाळांमध्ये हा आजार वेगाने पसरू शकतो.
गोवरची लस उपलब्ध असताना बालकांना ती न मिळणे हे आरोग्य व्यवस्थेचे अपयश आहे. गोवराला लसीमुळे प्रतिबंधित करणे सहज शक्य आहे. गेल्या काही दिवसांत गोवरबाधितांची संख्या वाढत आहे. बहुधा या मुलांनी कोरोनाच्या काळात गोवरची लस घेतली नसावी. आरोग्य विभागाला जर हा रुग्णांचा आकडा मोठा वाटत असेल तर त्यांनी सरसकट पाच वर्षांखालील सर्वच मुलांचे लसीकरण हाती घेतले पाहिजे, असे मला वाटते. मात्र या आजाराची तीव्रता तपासूनच अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात.- डॉ. सुहास प्रभू, बालरोगतज्ज्ञ
गोवर ज्या मुलाला झाला आहे, त्याच्या थुंकीतून हा आजार पसरण्याची क्षमता अधिक आहे. थुंकीवाटे कोरोनाची साथ पसरण्याचे प्रमाण एकास दोन असे होते. मात्र, हा आजार १२-१४ मुलांना पसरू शकतो. त्यामुळे त्याला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात काही मुलांचे गोवराचे लसीकरण राहिले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वेक्षण करून सगळ्या राहिलेल्या मुलाचे लसीकरण केले पाहिजे.- डॉ. विजय येवले, बालरोगतज्ज्ञ
लक्षणे काय? गोवर हा विषाणूपासून होणारा आणि संसर्गजन्य आजार आहे. तो शिंकण्यातून किंवा खोकल्यातून पसरतो. यामध्ये अंगावर लाल पुरळ आणि ताप येतो. या आजारात खोकला येतो. तो जाण्यास दोन आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. हा आजार झालेल्या मुलांमध्ये अ जीवनसत्त्वाची कमी असल्याने डोळे येण्यासारखे आजार होतात.
उपचारआरोग्यव्यवस्थेत या आजारावरील प्रतिबंधात्मक लस घेणे.
मुंबईमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आलेले असून एकूण ८४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.