मुंबईत गोवरची साथ आटोक्यात, तीन महिन्यांत एकाच ठिकाणी झाला होता उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 12:18 PM2023-04-06T12:18:13+5:302023-04-06T12:18:28+5:30

तीन महिन्यांत एकाच ठिकाणी गोवरचा झाला होता उद्रेक

Measles outbreak under control in Mumbai | मुंबईत गोवरची साथ आटोक्यात, तीन महिन्यांत एकाच ठिकाणी झाला होता उद्रेक

मुंबईत गोवरची साथ आटोक्यात, तीन महिन्यांत एकाच ठिकाणी झाला होता उद्रेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत वर्षाखेरीस चिंता वाढविणारी गोवरची साथ आता आटोक्यात आली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान शहर, उपनगरांत केवळ एका ठिकाणी गोवर उद्रेकाची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कुलाबा येथील हा उद्रेक असून तीन महिन्यांत १६५ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी ते मार्च कालावधीत गोवरचे चार मृत्यू झाले आहेत.

एक हजार ९५३ गोवर रुग्ण

मुंबईत २०२२ या वर्षात २१५ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला असून एकूण २२ हजार ५४० संशयितांची नोंद झाली आहे. त्यातील निश्चित झालेले रुग्ण एक हजार ९५३ इतके आहेत. शहर, उपनगरांत गोवरमुळे ११ मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संसर्ग कमी झाल्याने बंद केली आरोग्य केंद्र

शहर, उपनगरातील ए, सी, ई, एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, एल आणि एन विभागातील सुमारे २० आरोग्य केंद्र संसर्ग कमी झाल्याने बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

घरोघरी रुग्णांचे सर्वेक्षण सुरू

मुंबईतील एकूण १०,१५,२२,३५१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात आतापर्यंत ९७६ संशयित ताप आणि पुरळचे रुग्ण आढळले आहेत.

नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील ८४ आरोग्य केंद्रातील एकूण २,३२,१५९ बालकांपैकी २,१६,१४१ बालकांना गोवर रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे, म्हणजेच आतापर्यंत ९३.१० टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे. सहा ते नऊ महिने वयोगटातील २३ आरोग्य केंद्रातील ज्या ठिकाणी नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा आराेग्य केंद्रातील एकूण १०० टक्के म्हणजेच पाच हजार ११४ बालकांना लसींची मात्रा देण्यात आली आहे.

३३९ खाटांपैकी केवळ नऊ खाटांवर रुग्ण

गोवरच्या रुग्णांसाठी पालिकेने सुमारे ३३९ खाटा उपलब्ध केल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सातत्याने संसर्गात घट होत असल्याने रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सध्या शहर, उपनगरात ३३९ खाटांपैकी केवळ नऊ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. त्यातील दोन रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.

Web Title: Measles outbreak under control in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.