गोवराचा उद्रेक असा रोखणार; मुंबई महापालिकेचं ठरलंय, ‘ॲक्शन प्लॅन’ तयार , राज्य सरकारच्या सूचनांची प्रतीक्षा
By संतोष आंधळे | Published: November 25, 2022 08:37 AM2022-11-25T08:37:54+5:302022-11-25T08:40:28+5:30
Measles: गोवरच्या उद्रेकाला आळा घालण्याच्या संदर्भात बुधवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला केंद्राने काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ज्या भागांमध्ये विशिष्ट वयोगटासाठी गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे, तेथे नियमित लसीकरण वगळून अतिरिक्त लसीचा डोस द्यावा, हे सुचविले आहे.
- संतोष आंधळे
मुंबई : गोवरच्या उद्रेकाला आळा घालण्याच्या संदर्भात बुधवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला केंद्राने काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ज्या भागांमध्ये विशिष्ट वयोगटासाठी गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे, तेथे नियमित लसीकरण वगळून अतिरिक्त लसीचा डोस द्यावा, हे सुचविले आहे. मात्र गोवर उद्रेकाचा परिसर कोणता हे राज्य सरकारने ठरवायचे असून, त्यांनी त्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. महापालिका शासनाच्या आदेशाची वाट पाहत असली, तरी त्यांनी उद्रेक प्रतिसाद लसीकरण योजना तयार केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेले काही दिवस मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग गोवरविरोधात सक्षमपणे लढा देत आहे. गोवर उद्रेकाची ठिकाणे शोधून तेथे काम सुरू केले होते. गेल्या १५ दिवसांत ३,५००पेक्षा अधिक बालकांना दोन्ही मिळून, असे गोवर रुबेलाचा पहिला डोस आणि गोवर रुबेला गालगुंड हा दुसरा डोस देण्यात आला आहे. गोवरचे एकाच परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास त्याला आजाराचा उद्रेक म्हणून जाहीर करण्यात येते. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी असे परिसर शोधले आहेत.
केंद्र सरकाने लसीकरणाच्या संदर्भात दिलेल्या सूचनांमध्ये ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे तेथे नियमित लसीच्या नेहमीच्या डोसव्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी, असे सूचित केले आहे. तसेच, ज्या भागांमध्ये सहा ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवरबाधितांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तेथे गोवर आणि रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात यावी, असे सांगितले आहे.
उद्रेक प्रतिसाद लसीकरण योजना
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकाच्या सूचना आम्ही पाहिल्या आहेत. राज्य सरकारने एकदा आम्हाला केंद्राच्या सूचनेप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या तर तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सगळी माहिती गोळा करून ठेवली आहे. फक्त लसीची कमतरता पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वेक्षणामध्ये सगळ्या बालकांची नोंद करून ठेवण्यात आलेली आहे.