Join us

पनवेल ते वसईपट्ट्यात गोवरचा धोका अधिक; पालकांना सावध राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 8:56 AM

मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले

मुंबई-  मुंबई महानगरातील गोवरचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा आणि  रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पनवेल ते वसईपट्ट्यातील बालकांना गोवरचा अधिक धोका असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या परिसराती नागरिकांना आपल्या मुलांची काळजी घेण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. 

गोवर हा आजार जगभर सर्वत्र कमीअधिक प्रमाणात आढळतो. जेव्हा एखाद्या लोकवस्तीत असंरक्षित म्हणजे लस न घेतलेल्या आणि कधीही गोवर न झालेल्या बालकांची एकत्र संख्या ऐकून बालसंख्येयच्या ४० टक्कयांहून अधिक असते, तेव्हा उद्रेक होत असल्याचे आढळतो. आपल्या देशात सार्वत्रिक लसीकरण होण्यापूर्वी वर्षाला अडीच लाख (२.४७ लाख १९८७) बालकांना गोवर होत असे. लसीकरणाचे प्रमाण वाढू लागल्यावर ही संख्या कमी होत गेली. २०१८ मध्ये भारतभरात २०,८९५ बालकांना गोवर झाला व त्यात ३४ बालकांचा मृत्यू झाला. कोरोना महामारीच्या काळात अनेक बालकांचे लसीकरण हुकले व सध्या गोवराने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्यास नियंत्रणात आणायचे असेल तर हा आजार नीट समजून घेणे आवश्यक आहे.

गोवर कशामुळे होतो?

गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात. प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही.

आजाराचे स्वरूप-

संसर्ग झाल्यापासून १० दिवसानंतर ताप, नाक गळणे, शिंका, पडसे, खोकला, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे व कधीकधी डोळ्यांना प्रकाशाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. उलटी, जुलाब होऊ शकतात. प्रत्यक्ष पुरळ येण्याच्या एक-दोन दिवस आधी गालाच्या आतल्या बाजूस मिठाच्या खड्यासारखे ठिपके दिसतात. ज्यांना कौप्लिक्स स्पॉट म्हणतात. ते सहसा छोटे, टाचणीच्या जाड टोकाहून लहान, निळसर पांढरे, असून लालसर पार्श्वभूमीवर उठून दिसतात.

उपाय-

गोवर झालेल्या बालकास 'अ' जीवनसत्वाच्या अतिरिक्त मात्रा द्याव्या लागतात. सहा महिने ते एक वर्षाखालील एक मिलीलिटर (१लाख इंटरनॅशनल युनिटस) तर १ वर्षावरील बाळास २ मिलीलिटर (२ लाख इंटरनॅशनल युनिटस) इतके ‘अ’ जीवनसत्व ‘दिले जाते.

लस-

गोवर प्रतिबंधाचा सर्वात प्रभावी  उपाय म्हणजे गोवरची लस. गोवरची लस फक्त गोवर, गोवर-जर्मन गोवर (MR ) व गोवर गालगुंड व जर्मन गोवर (MMR) आणि कांजिण्यासह म्हणजे (MMRV) अशा चार स्वरूपात उपलब्ध आहे. गोवराच्या लसीची पहिली मात्रा ९ महिने पूर्ण झाल्यावर तर दुसरी मात्रा १५ ते १८ महिन्यादरम्यान द्यावी लागते.

टॅग्स :पनवेलमहाराष्ट्र सरकारवसई विरार