Join us

राज्यात गोवरची साथ वाढणार, टास्क फोर्सच्या बैठकीत चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 8:49 AM

राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेला गोवरचा संसर्ग नवीन वर्षातही कमी झालेला नाही. परिणामी, नुकत्याच राज्याच्या गोवर टास्क फोर्सच्या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांनी गोवरचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

मुंबई  : राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेला गोवरचा संसर्ग नवीन वर्षातही कमी झालेला नाही. परिणामी, नुकत्याच राज्याच्या गोवर टास्क फोर्सच्या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांनी गोवरचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे गोवर प्रतिबंध व नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलत नऊ महिन्यांहून कमी वयाच्या लहानग्यांनाही आता गोवर लसीचा अतिरिक्त डोस देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाकडून केंद्र शासनाला पत्र देण्यात येणार आहे.राज्यात गोवरचा उद्रेक झाल्यापासून नऊ महिन्यांखालील ७२ टक्के नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात मुंबई, मालेगाव आणि अकोला या प्रमुख भागांत लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.  गोवर उद्रेक झालेल्या ठाणे, अमरावती आदी भागांत प्रामुख्याने सहा ते नऊ महिन्यांमधील नवजात बालकांना सुरुवातीला अतिरिक्त गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण दिले जाईल.   लसीकरणाची मोहीम व्यापक स्तरावर राबविली जाणार असल्याने अपेक्षित गोवर डोसची संख्या तसेच स्वतंत्र गोवर तपासणी प्रयोगशाळांच्या मुद्यांवर लवकरच चर्चा करण्यात येणार आहे.

कृतिशील धोरणाची आखणीराज्यात गोवरचा उद्रेक मार्च महिन्यापर्यंत सुरू राहण्याची भीती आहे. मात्र, गोवरचा उद्रेक आटोक्यात येण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग कृतिशील धोरण आखत आहे. पुन्हा नव्याने याविषयी निरीक्षणे, मते मांडण्यात येत आहे. त्याप्रमाणे, तळागाळात अंमलबजावणीसाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती राज्य गोवर टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिली आहे.   

टॅग्स :आरोग्यमहाराष्ट्र