वायू प्रदूषण रोखण्यासाठी देशपातळीवर उपाय; इंडिया क्लीन एअर कनेक्ट प्लॅटफॉर्म’चा विशेष उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:29 AM2023-12-27T10:29:10+5:302023-12-27T10:30:13+5:30
वायू प्रदूषण टाळण्याकरिता काम करता यावे म्हणून ‘इंडिया क्लीन एअर कनेक्ट प्लॅटफॉर्म’ने विशेष उपक्रम सुरू केला आहे.
मुंबई : वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असताना सर्वसामान्य नागरिकांसह प्रत्येक घटकाला वायू प्रदूषण टाळण्याकरिता काम करता यावे म्हणून ‘इंडिया क्लीन एअर कनेक्ट प्लॅटफॉर्म’ने विशेष उपक्रम सुरू केला आहे. वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांवर राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना करणे हा यामागचा हेतू असून वातावरणाशी निगडित सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
भारतात वर्षभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास एक तृतीयांश मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत असून, जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांपैकी जवळपास ७० टक्के शहरे भारतात आहेत, तसेच बहुतांश शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा गुणवत्ता मानकांची पूर्तता करीत नसल्याने मोठ्या लोकसंख्येला वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांचा धोका आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत सावध होत वायू प्रदूषणावर प्रगत अशी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. परिणामी, याचा फायदा संस्था, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांना होणार आहे.
वायू प्रदूषणाचे आव्हान हे गुंतागुंतीचे आहे. त्यासाठी सर्व घटकांकडून एकत्रित कृतीची गरज आहे. कमतरता दूर करण्यासाठी इंडिया क्लीन एअर कनेक्ट काम करत आहे.
- ब्रिकेश सिंग, असर
ज्ञान, माहिती साठा, उपाययोजनांचे दालन यात वाढ करणे, नवीन बाबी आत्मसात करणे, हवा गुणवत्ता संबंधित सर्वांचे प्रयत्न संरेखित करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म कार्यरत राहील.- अंकित भार्गव, सह संस्थापक, सेन्सिंग लोकल
उद्दिष्टे : एअर क्वालिटी इकोसिस्टमचे मॅपिंग, ज्ञान, माहिती आणि संसाधनांचे दालन
लाभ कोणाला होणार ?
उपाय, स्रोत आणि माहिती शोधणाऱ्यांना, हवा गुणवत्ता क्षेत्र धुंडाळण्यात स्वारस्य असलेल्यांना, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या मात्र आव्हानांचा सामना करणाऱ्या संस्थांना
काय माहिती मिळणार?
वेबिनार, व्याख्याने, चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा
शासकीय अधिसूचनांची ताजी माहिती
संशोधक, धोरणकर्ते आणि नागरिकांसाठी हवा प्रदूषणाशी निगडित
अहवाल, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम
मायक्रो ॲक्शन प्लॅन्स
हवा गुणवत्ता क्षेत्रातील रोजगार