Join us

वरळी व आसपासच्या वाहतुकीत होणारी अडचण टाळण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता एमएमआरडीएने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यात मेट्रो, मुंबई ...

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता एमएमआरडीएने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यात मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सोबत वरळी - शिवडी उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचा समावेश आहे. आणि आता याच प्रकल्पा अंतर्गत वरळी व आसपासच्या वाहतुकीत होणारी अडचण टाळण्यासाठी आगामी उपाययोजनांचा आढावा घेतला गेला आहे.

एमएमआरडीए याबाबत सतत बैठका घेत असून, महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास हे अधिकारी वर्गाला सूचना करत यावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. याबाबत आयोजित बैठकीत वरळी - शिवडी उन्नत मार्ग संबंधी कनेक्टरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपाय तसेच एकूण प्रकल्प प्रगतीविषयी चर्चा केली गेली. वरळी - शिवडी उन्नत मार्ग एमटीएचएल व कोस्टल रोड प्रकल्पातील वाहनांची रहदारी ओढून घेईल. म्हणून आयुक्तांनी वरळी व आसपासच्या वाहतुकीत होणारी अडचण टाळण्यासाठी आगामी उपाययोजनांचा आढावा घेतला. आयुक्तांनी वरळी - शिवडी उन्नत प्रकल्पासाठी नाला वळण आणि एसआरए योजनेंतर्गत पीएपींच्या पुनर्वसनाबद्दलही चर्चा केली. वरळी - शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाशी संबंधित अन्य प्रमुख घटकांवरही चर्चा झाली. कापड नाला वळविणे, मोनोरेल स्टेशन क्रॉसिंग समस्या आणि त्याचे तांत्रिक उपाय आणि रफी अहमद किदवई रोड युटिलिटी समस्या आणि त्याचे तांत्रिक उपाय या विषयांवर जोर देण्यात आला.

मेट्रो लाइन ५, लाइन ९ आणि लाइन ७ अ संदर्भातील आढावा बैठकीत महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी या तीन मेट्रो मार्गांच्या एकूण प्रगतीबरोबरच जमिनीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.