मुंबई : उत्तराखंडातील नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा रविवारी कोसळून मोठी दुर्घटना घडली. जगभरात हवामान आणि तापमानातील बदलामुळे अशा काही दुर्घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. यावर सर्वच स्तरांवर विचार होण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन हवामान बदलावर अभ्यास करण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा विभाग कार्यरत होणार आहे. त्यामार्फत तापमान वाढीवरील नियंत्रणासाठी कोणती काळजी अथवा उपाययोजना कराव्या, यावर अभ्यास करून प्रयत्न केले जाणार आहेत.मुंबई महापालिका ही जागतिक स्तरावरील सी - ४० या आंतरराष्ट्रीय पर्यावरण चळवळीशी जोडली गेली आहे. पॅरिस करारानुसार सी-४० चळवळ सन २०३० पर्यंत तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी सुरू झाली आहे. या चळवळीच्या माध्यमातून तापमानवाढ रोखण्यासाठी उपाय शोधण्यात येणार आहेत. त्यानंतर हे उपाय जगातील इतर शहरांनाही सुचविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत हा विभाग स्थापन केला जाणार आहे. या विभागामार्फत मुंबईतील तापमान बदल आणि वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय शोधले जाणार आहेत. या चळवळीत बंगलोर, चेन्नई, कोलकाता, जयपूर, दिल्ली अशी शहरं सहभागी झाली आहेत. जगभरातील ९७ शहरे या चळवळीशी जोडली गेली आहेत.हरित ऊर्जेचा पर्याय पालिकेने अवलंबला पालिकेने यापूर्वीच तापमान वाढीसंदर्भात उपाय साधण्यासाठी हरित ऊर्जेचा पर्याय अवलंबला आहे. यामध्ये मध्य वैतरणा धरणावर २० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प व ८० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीलाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
तापमान नियंत्रणासाठी पालिका सुचविणार उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 2:26 AM