Join us

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना अधिक वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात यश येत आहे; पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात यश येत आहे; पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य सुविधा बळकट असाव्यात यासाठी मुंबई महापालिका अधिक वेगाने उपाययोजना करीत आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता मुंबई आणि शहर उपनगरात असणाऱ्या रुग्णालयांतील बेड कमी पडू नयेत याकरिता मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी खाजगी अथवा सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांना वेळेवर सेवा आणि बेड उपलब्ध होतील याकरिता महापालिका नियोजन करीत आहे. यासाठी ऑक्सिजन खाटांचे प्रमाण ७० टक्के करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर बाधा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी त्यांच्यावर वेळेत आणि चांगले उपचार करता यावेत यासाठी कोरोना केंद्रात स्वतंत्र विभाग असणार आहे. १ हजार आयसीयूचे नियोजन केले जात आहे. मालाड, महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा येथे कोरोना केंद्रे उभी करण्यात येत आहेत. येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या केंद्रांमुळे आवश्यक बेडची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, असा दावादेखील केला जात आहे.

मुंबई महापालिकेने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ज्या पद्धतीने नियोजन केले आहे, त्या पद्धतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणदेखील याकामी पुढे सरसावले आहे. प्राधिकरणाकडून मालाड येथे कोरोना केंद्राची उभारणी केली जात आहे. हे केंद्र जून महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. हे केंद्र पूर्ण झाले की ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले जाईल, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.

दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून, या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. संभावित तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्याने पूर्वतयारी केली आहे. आरोग्ययंत्रणेची क्षमतावाढ करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती, त्याची साठवणूक आणि वाहतूक हे मिशन ऑक्सिजन स्वावलंबन महाराष्ट्रांतर्गत केले जात आहे.