मुंबई : रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या उपाययोजना प्रभावी आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात विशेषत: मुंबईत रुग्णवाहिकांच्या तुटवड्याबद्दल दाखल केलेली जनहित याचिका शुक्रवारी निकाली काढली.परिसरातील रुग्णवाहिकांचा संपर्क क्रमांक, त्यांचा नंबर आणि या लोकांनी सेवा देण्यास नकार दिला तर कुठे तक्रार करायची, याची माहिती आॅनलाइन उपलब्ध केल्याची माहिती सरकारी वकिलांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. ‘एका क्लिकवर रुग्णाला खासगी रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक, परिसरात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आणि तिचा मालक तसेच दराची माहितीही उपलब्ध होते. तसेच रुग्णवाहिकेच्या मालकाने भाडे नाकारले तर त्याची तक्रार कोणत्या विभागाकडे करायची, याचीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी ७८० खासगी रुग्णवाहिकांपैकी ७०० रुग्णवाहिका कार्यरत असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे न्यायालयाला स्पष्ट करत सोमय्या यांनी दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढली.
रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी राज्य सरकारने आखलेल्या उपाययोजना प्रभावी - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 4:53 AM