मेकॅनिकल वजनकाटे सील

By admin | Published: February 4, 2015 02:39 AM2015-02-04T02:39:16+5:302015-02-04T02:39:16+5:30

राज्यातील सर्व साखर कारखान्यांत मेकॅनिकल वजनकाटे किंवा वे ब्रिजऐवजी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश देत वैध मापनशास्त्र विभागाने धडक कारवाईस सुरुवात केली आहे.

Mechanical weights seal | मेकॅनिकल वजनकाटे सील

मेकॅनिकल वजनकाटे सील

Next

चेतन ननावरे - मुंबई
राज्यातील सर्व साखर कारखान्यांत मेकॅनिकल वजनकाटे किंवा वे ब्रिजऐवजी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश देत वैध मापनशास्त्र विभागाने धडक कारवाईस सुरुवात केली आहे. आदेशानंतरही मेकॅनिकल वजनकाटे वापरणाऱ्या साखर कारखान्यांमधील वजनकाटे सील करीत विभागाने कारखान्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मेकॅनिकल वजनकाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्याने इलेक्ट्रॉनिक काट्याची सक्ती केल्याची माहिती विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी दिली. पाण्डेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे सर्व साखर कारखान्यांत ऊसमोजणी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काटे वापरण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय मेकॅनिकल काट्यावर ऊसमोजणी करताना काही साखर कारखाना प्रशासनांकडून प्रत्येक शेतकऱ्याकडून २५० ते ३०० किलो अधिक ऊस घेतला जात होता. अशा कारखान्यांविरोधात प्रशासनाने कारवाई केली आहे. मेकॅनिकल वजनकाट्यांवर कारवाई करताना प्रशासनाने रांजणी शुगर कारखाना, उद्गीर शुगर फॅक्टरी प्रा. लि. या कारखान्यांसह जळगाव, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील एकूण ८ कारखान्यांवर कारवाई केली आहे.

इलेक्ट्रॉनिक वजनकाटे दुरुस्त करणाऱ्या बहुतेक दुरुस्तकांचे परवाने शासनाने अपात्र ठरवत डिसेंबर महिन्यात रद्द केले आहेत. त्यामुळे कारखान्यांतील वजनकाटे योग्यरीत्या कार्यरत आहेत की नाहीत याची तपासणी करण्याचे काम वजनकाट्याचे उत्पादन करणाऱ्या मॅन्युफॅक्चर कंपन्यांना करण्यास सांगण्यात आले होते.

यासाठी सर्व काटे तपासण्यास शासनाने एका महिन्याची मुदत दिली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाचे अधिकारी अचानक भेट देऊन कारखान्यांतील वजनकाट्यांची तपासणी करतील. त्यात सदोष वजनकाटे आढळल्यास कारखाना मालकासह उत्पादकावरही गुन्हे नोंदवण्यात येतील, असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकऱ्यांकडून नोंद केलेल्या वजनाहून अधिक ऊस घेणाऱ्या सांगलीतील वसंतदादा सहकारी साखर कारखाना आणि आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्यांवरही कारवाई केली आहे. या कारखान्यांत ६० टन क्षमतेच्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर २५० ते ३०० किलो अधिक ऊस घेतला जात होता.

शेतकऱ्यांना आवाहन, मालकांना ताकीद !
साखर कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनी कारखान्यात इलेक्ट्रॉनिक वजनकाटा नसल्यास ०२२-२२८८६६६६ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवाय कारखान्याला ऊस देताना नोंद केलेल्या वजनाहून अधिक ऊस तोलून घेणाऱ्या कारखान्यांविरोधातही शेतकऱ्यांना तक्रार करता येईल, असे प्रशासनाने सांगितले. नोंद केलेल्या वजनाहून अधिक ऊस घेता येणार नाही, अशी ताकीद शासनाने कारखान्याच्या मालकांना दिली आहे.

Web Title: Mechanical weights seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.