मुंबई : कर्करोगाचा यशस्वी सामना करण्यासाठी वेळेत रोगाचे निदान होणे आवश्यक आहे. ‘अर्ली डायग्नेसिस, अर्ली ट्रीटमेंट’ (लवकर निदान, लवकर उपचार) हे कर्करोगात महत्त्वाचे आहे. त्यामुळे या रोगाबाबत जनजागृती आवश्यक आहे. शिवाय कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. ग्रामीण स्नेह फाउंडेशनतर्फे आयोजित ‘हौसला - फाईट अगेंस्ट कॅन्सर - २०१६’ या कार्यक्रमात सावंत बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, धर्मदाय आयुक्त न्या. एस.पी. सावळे, आचार्य चंदनाजी महाराज, ग्रामीण स्नेह फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा रौत्रे आदी उपस्थित होते. या वेळी सावंत म्हणाले की, शासनामार्फत कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच राज्यातील ३६ जिल्ह्यांत टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्यातून कॅन्सर वॉरिअर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कर्करोगाच्या उपचारासाठी मदत घेतली जाणार आहे. शिवाय पुणे येथे कर्करोग रुग्णांची काळजी घेण्याबाबत प्रशिक्षण देण्याकरिता प्रिलेटिव्ह केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे सावंत यांनी सांगितले. कर्करोगाशी लढा देण्यात स्वयंसेवी संस्थांचे कार्य महत्त्वाचे असल्याचाही उल्लेख सावंत यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)
कर्करोग निदानासाठी जिल्हास्तरावर यंत्रणा
By admin | Published: July 25, 2016 3:20 AM