Join us  

अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 8:18 PM

काय आहे आयटीएमएस? ही प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या सविस्तर

महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अटल सेतूवर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) कार्यान्वित करण्यासाठी परिवहन विभागाने त्यासंबंधी चाचणी केली. मात्र, ‘आयटीएमएस’ हे पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी उभारलेली यंत्रणा सक्षम नसल्याचे निष्पन्न झाले आहे. परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी त्यांची गाडी अटल सेतूवरून ११० प्रतिकिलोमीटर वेगाने पळवली. पण, तिथे उभारण्यात आलेल्या गँट्रीवरील कॅमेऱ्याने ती नजरबंद केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अटल सेतूवर अशा तीन गँट्री आहेत. तिथेही हाच अनुभव आल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने अटल सेतूवर उभारलेली यंत्रणा आयटीएमएस प्रणालीसाठी तयार आहे. आरटीओने तिची तपासणी करून ती अतिवेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांवर, अवैध फास्ट टॅगवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रमाणित करावे, असे पत्र मुंबई ‘एमएमआरडीए’ने तीन महिने आधी पाठविले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी बुधवारी या यंत्रणेची तपासणी करून काही चाचण्या घेतल्या. त्यात ही यंत्रणा ‘आयटीएमएस’साठी सक्षम नाही. अटल सेतूवरील यंत्रणा ही ओव्हर स्पीड करणाऱ्या वाहनांचा वेगसुद्धा मोजू शकत नसल्याने ती चलन जारी करण्यासाठी सक्षम नसल्याचे आढळले.

नियमांच्या उल्लंघनाची नोंद

‘आयटीएमएस’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा आहे. तिच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ प्रकारच्या गुन्ह्यांची स्वयंचलितपणे नोंद करणे अपेक्षित आहे. परंतु, अटल सेतूवर असलेल्या यंत्रणेद्वारे फक्त नो पार्किंग, चुकीच्या दिशेने वाहतूक करणे आणि फास्ट टॅग वैध नसणे अशा मोजक्या गुन्ह्यांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये यंत्रणेद्वारे लेन कटिंग, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट नसणे किमान अशा ७ ते ८ गुन्ह्यांची ओळख पटणे अपेक्षित होते. मात्र, तपासणीदरम्यान या यंत्रणेची कार्यक्षमता सिद्ध झाली नाही. त्यामुळे परिवहन विभाग ‘एमएमआरडीए’सोबत पत्रव्यवहार करून ‘आयटीएमएस’साठी सुसज्ज, अत्याधुनिक कॅमेरे बसवण्याबाबत कळविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे आयटीएमएस?

इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक प्रणाली आहे, जी वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी वापरली जाते. या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास स्वयंचलितपणे चलन जारी केले जाते.

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवाहतूक कोंडीनवी मुंबईमुंबई