लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मुंबईत ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मागील वर्षभरात या रुग्णाच्या कुटुंबियांनी विविध अडचणींचा सामना केला आहे. अद्यापही कोरोनाचे भय संपले नाही. पुन्हा वर्षभराने कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. १ ते ८ मार्च २०२१ दरम्यान, मुंबईसह राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दुसरीकडे, १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरणाचा पहिला, दुसरा व तिसरा टप्पा सध्या एकत्रित सुरू आहे; पण तरीही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, परिणामी पुन्हा एकदा संसर्ग नियंत्रणासाठी पालिका व राज्य शासन विविध पातळ्यांवर झटत आहे.
गेल्या वर्षी ११ मार्च २०२० रोजी मुंबईत दोन कोरोनाग्रस्त आढळले होते. एका खासगी टूर कंपनीच्या माध्यमातून ४० लोक अमेरिकेला जाऊन भारतात आले होते. त्यापैकी २ जण पुण्यात ९ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या दोन जणांच्या संपर्कात आलेले २ जण मुंबईत ११ मार्चला पॉझिटिव्ह आले होते. हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील होते. मुंबईत पहिला कोरोना रुग्ण आढळल्यापासून मुंबई महापालिका प्रशासन कोरोना रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांची म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला पूर्णतः तसे यश आलेले नाही.
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोना रुग्णाचे निदान होऊन वर्ष उलटले असले तरीही यंत्रणांनी यापूर्वीच ही परिस्थिती उत्तम हाताळली आहे. सध्या वाढत असलेले रुग्ण हे अनलॉक, सामान्यांची वाढती बेफिकिरी आणि नियमांचे उल्लंघन यामुळे आहे, त्यामुळे आता प्रशासन याबाबतीत अत्यंत कठोर झाले असून, कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत.
आणि मग कोरोना वाढला
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव २०१९ मध्ये नोव्हेंबर, डिसेंबरपासून जाणवू लागला होता, तेव्हापासून मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळून येईपर्यंत तब्बल २ लाख प्रवासी मुंबईत आले. या प्रवाशांची विमानतळावर योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले असते तर मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झालाच नसता, असे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईत नाईट कर्फ्यू लावताना म्हटले होते.
कोविड केंद्र ठरले आधार
कोरोना रुग्ण आढळून येताच रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या हायरिस्क लोकांना शोधून क्वारंटाईन केले. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या. त्याठिकाणी कमी दरात उपचार उपलब्ध करून दिले. रुग्ण शोधता यावेत म्हणून पालिका आणि खासगी लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने बिकेसी, नेस्को, वरळी, मुलुंड आदी ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळाव्यात यासाठी पालिकेच्या २४ विभागांत वॉर्ड वॉररूम उभारण्यात आले.
रुग्ण वाढत असले तरी औषधसाठा पुरेसा
कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून, आता दुसऱ्या बाजूला रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या परिस्थितीला घाबरून न जाण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. राज्य शासन आणि पालिका यंत्रणा संसर्ग नियंत्रणासाठी सज्ज असून, औषधसाठा पुरेसा उपलब्ध असल्याचे पालिकेने सांगितले.