Join us

सेंच्युरी मिलविरोधात मेधा पाटकर यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कंपनीने स्वेच्छानिवृत्तीची नोटीस बजावल्याच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शुक्रवारी सेंच्युरी यार्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कंपनीने स्वेच्छानिवृत्तीची नोटीस बजावल्याच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शुक्रवारी सेंच्युरी यार्न आणि डेनिम कंपनीविरोधात आंदोलन केले. प्रभादेवी येथील सेंच्युरी भवनसमोर झालेल्या या आंदोलनात कर्मचारी, घर बचाओ आंदोलनचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कंपनीने बेकायदेशीरपणे स्वेच्छानिवृत्तीची नोटीस बजावल्याच्या विरोधात जाब विचारण्यासाठी सेंच्युरी मुख्यालयासमोर श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर, सरचिटणीस जगदीश खैरालिया यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शने केली. स्वेच्छानिवृत्तीची नोटीस मागे घ्यावी, कंपनी सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यालयासमोरच्या फुटपाथवरच आंदोलन छेडण्यात आले. कंपनीकडून कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, कोरोना नियमांचा दाखला देत पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासह समर्थकांना ताब्यात घेत दादर स्थानकात नेले. दरम्यान, पाटकर यांनी या पोलिस कारवाईचा निषेध केला. आत्तापर्यंत कोणत्याही आंदोलनाच्या वेळी अशी वागणूक मिळाली नव्हती. वर्षा बंगल्यावरही नाही. मात्र आजची वागणूक पाहता महाविकास आघाडी सरकार आणि केंद्राने शेतकरी आंदोलनात दिलेली वागणूक यात फरक नाही असेच वाटल्याचे पाटकर म्हणाल्या.