मुंबई : दहा वर्षांपूर्वी एमएमआरडीएने जमीनदोस्त केलेल्या झोपडीधारकांना पुन्हा घरे द्यावीत, या मागणीसाठी मेधा पाटकर यांनी मंगळवारी मानखुर्दमध्ये आंदोलन केले. शासनाने गरिबांना त्यांचा हक्क न दिल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी मेधा पाटकर यांनी दिला आहे. मानखुर्द मंडाला परिसरात २००५मध्ये एमएमआरडीएने मोठ्या प्रमाणात तोड कारवाई करीत येथील ३ हजार झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या. झोपडीधारकांच्या आंदोलनानंतर त्यांना घर देण्याचे आश्वासन त्या वेळी एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. मात्र १० वर्षांनंतरही येथील झोपडीधारकांना घर मिळालेले नाही. या रहिवाशांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. याबाबत शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनदेखील त्यावर योग्य कार्यवाही झालेली नाही. गरिबांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)भूमाफियांकडे दुर्लक्ष या परिसरात काही भूमाफिया तिवरांच्या झाडांची कत्तल करून अनधिकृतरीत्या घरे बांधत आहेत. अशा माफियांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र ज्यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी घरे होती, त्यांना या ठिकाणी घर बांधून दिले जात नसल्याचा आरोप पाटकर यांनी केला.
मेधा पाटकर यांचे आंदोलन
By admin | Published: May 27, 2015 12:25 AM