माध्यम समन्वयक प्रेम झांगियानी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 07:50 AM2022-12-25T07:50:01+5:302022-12-25T07:50:27+5:30
चित्रपट प्रमोशनच्या कामात बिझी असणाऱ्या प्रेम यांना वरळी येथील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये लहान-सहान भूमिका साकारण्यासोबतच मराठी चित्रपटांसाठी माध्यम समन्वयक म्हणून काम पाहणारे अभिनेते प्रेम झांगियानी (वय ५४) यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. ‘वेड’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात बिझी असणाऱ्या प्रेम यांना वरळी येथील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा निशांत आणि व्यावसायिक भागीदार प्रज्ञा शेट्टी असा परिवार आहे. २७ डिसेंबरला वरळी स्मशानभूमीत प्रेम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महिन्याभरापूर्वीच प्रेम यांच्या आईचेही निधन झाले.
काही दिवसांपूर्वीच प्रेम यांनी ‘वेड’च्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्यासोबत ‘लोकमत’च्या वरळीतील कार्यालयाला भेट दिली होती. प्रेम यांनी बालकलाकार म्हणून आपली अभिनय कारकीर्द सुरू केली होती. कोरोनानंतरच्या काळात त्यांनी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ या चित्रपटात त्यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली आहे. शाहरूख खानच्या ‘पठाण’सोबतच हंसल मेहतांच्या आगामी चित्रपटातही ते दिसणार आहेत. प्रसिद्धी आणि फिल्म मार्केटिंग क्षेत्रात त्यांनी खूप काम केले असून, बऱ्याच मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम केले आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या प्रेम यांचा ‘लूट है’ हा डायलॅाग सर्वांच्या परिचयाचा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"