सोहराबुद्दीन खटल्याच्या वृत्तांकनास प्रसारमाध्यमांना घातली बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:02 AM2017-11-30T06:02:27+5:302017-11-30T06:02:42+5:30
विशेष सीबीआय न्यायालयाने प्रसारमाध्यमांना सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाचे वृत्तांकन करण्यास बंदी घातली आहे. पुढील आदेश देईपर्यंत ही बंदी लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने प्रसारमाध्यमांना सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाचे वृत्तांकन करण्यास बंदी घातली आहे. पुढील आदेश देईपर्यंत ही बंदी लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हा खटला अत्यंत संवदेनशील असून त्यामधील आरोपी व साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांवर बंदी घालावी, यासाठी बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला. प्रसारमाध्यांना या खटल्याचे वृत्तांकन करू दिले आंिण त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले तर कोणतीही अप्रिय घटना घडू शकते. त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
मात्र न्यायालयात उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला विरोध केला. खटल्याची सुनावणी कुठवर आली आहे, हे जाणण्याच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल, असे प्रतिनिधींनी न्यायालयाला सांगितले.
युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्याचे वृत्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांना बंदी घातली. ‘ही केस संवेदनशील आहे. यादरम्यान अप्रिय घटना घडू शकते आणि त्याचा खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणत न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत या खटल्याचे वृत्तांकन न करण्याचा आदेश प्रसारमाध्यमांना दिला.