Join us

प्रसारमाध्यमांनी देशहित विचारात घेऊन बातम्या प्रसारित कराव्यात- हेमंत महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 3:19 AM

दहशतवादी संस्था, चिनी घुसखोरीवर व्याख्यान

मुंबई : प्रसारमाध्यमांमध्ये हल्ली स्पर्धा वाढू लागली आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात प्रसारमाध्यमांनी देशहिताचा विचार करून नकारात्मक बातम्या टाळून सकारात्मक बातम्या प्रसारित करायला हव्यात, असे मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने रविवारी ‘भारताच्या डिजिटल सीमेचे संरक्षण, अनिवासी भारतीयांच्या दहशतवादी संस्था व उन्हाळ्यात होणारी चिनी घुसखोरी’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, काही वृत्त निवेदक बनावट बातम्या प्रसारित करतात, तर काही डिजिटल मॅगझिनमध्येही अशाच प्रकारचे अतार्किक प्रसारण केले जाते. अनेकदा परदेशी व्यक्तीचे भारताविरोधातील अभ्यासशून्य वक्तव्य असले तरी त्याला प्रसिद्धी दिली जाते. कमला हॅरिस व त्यांचे नातेवाईक, तसेच पॉपस्टार रिहानाच्या वक्तव्याला अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. वृत्तपत्रांची स्थिती सध्या आर्थिकदृष्ट्या खराब आहे. डिजिटल प्रसारमाध्यमांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. मात्र, हे बदल होत असताना प्रसारमाध्यमांनी देशहिताचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी इराणने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची त्यांनी माहिती दिली, तसेच अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटात काही हिंदू मरण पावले. त्यामुळे तेथे हिंदू व शीख सुरक्षित नसल्याचे हेमंत महाजन यांनी सांगितले.  प्रत्येक चिनी बाब देशाला घातक आहे. अलीकडेच अर्थसंकल्पाबाबत विविध नामांकित वृत्तपत्रांनी गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. मात्र, सध्या पंजाबमध्ये व हरयाणा या भागात सुरू असणाऱ्या घटनांमुळे दिल्लीतील आर्थिक स्थिती, कामे यात अडथळे आले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सीमेवर चीन वसवत आहे ६०० गावेजमिनीवरील सीमा व त्यांच्या रक्षणासाठी भारताने ९९ टक्के काम केले आहे, तर सागरावर ५० टक्के संरक्षण राखण्याचा प्रभाव भारताने दाखवला आहे. सोशल मीडियामध्ये राष्ट्रीय हिताविरोधात संदेश बाहेरील देशांमधून येतात. काही अनिवासी भारतीयांच्या संस्था भारताविरोधात काम करत आहेत, यावर सरकारचे नियंत्रण दिसून येत नाही. भारत-चीन सीमेवर चीन ६०० गावे वसवत आहे, अशी एक बातमी आली होती. मग आपण आपल्या सीमेवर, अशी गावे व लोकांना का वसवत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.