लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहिणीचे पतीसोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणे भावाच्या जीवावर बेतल्याची घटना शिवाजी नगरमध्ये घडली. याप्रकरणी रफिक युनूस शेख (२२) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरात राहणारे जहांगीर सौरभ पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण यांचा भाऊ शादाबने गुरुवारी त्यांची बहीण फर्जाना आणि तिचा पती रफीकमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. याच रागात रफिकने त्याच्याजवळील चाकूने शादाबच्या मानेजवळ चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. तसेच फर्जानाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने हल्ला चढवला तर जहांगीर यांच्याही हत्येचा प्रयत्न केला, मात्र ते थोडक्यात वाचले.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत रफिकला अटक केली आहे.
.....................................