जी टी आणि कामा रुग्णालय मिळून मेडिकल कॉलेज
By संतोष आंधळे | Published: March 18, 2024 10:56 PM2024-03-18T22:56:39+5:302024-03-18T22:56:58+5:30
Mumbai News: गेल्या काही महिन्यापासून दक्षिण मुंबईतील जी टी रुग्णालयाचे रूपांतर मेडिकल कॉलेज मध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे केवळ एकट्या जी टी रुग्णालयाचे कॉलेज मध्ये रूपांतर करणे अवघड आहे.
- संतोष आंधळे
मुंबई - गेल्या काही महिन्यापासून दक्षिण मुंबईतील जी टी रुग्णालयाचे रूपांतर मेडिकल कॉलेज मध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे केवळ एकट्या जी टी रुग्णालयाचे कॉलेज मध्ये रूपांतर करणे अवघड आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनाची पूर्तता करण्यासाठी कामा रुग्णालयय आणि जी टी रुग्णालयाला संलग्नीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेस वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिल्याने आता दोन्ही रुग्णलयाचे मिळून मेडिकल कॉलेज तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देशात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परवानगी बंधनकारक असते. त्यांची परवानगी मिळविण्यासाठी त्यांच्या मानांकनांची पूर्तता गरजेचे असते. त्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व एम बी बी एस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणाऱ्या सर्व विषयांचे विभाग, लेक्चर हॉल, रुग्णालयातील विशिष्ट बेड्सची संख्या, प्रयोगशाळा या आणि अशा तत्सम गोष्टींची गरज असते. त्याची पूर्तता करता यावी म्हणून कामा रुग्णालयाची मदत लागणार असल्याने त्या दोन्हीरुग्णलयाचे संलग्नीकरण करून मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आता विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच याठिकाणी नेमणूक केली आहे. आयोगाची तज्ज्ञ समिती महाविद्यालय पाहणी करण्यासाठी कधीही येऊ शकतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने अध्यापकांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे.
कॉलेज सुरू करण्यासाठी शासनातर्फे लागणारे सक्षमता प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून बंधनकारक असणारे संलग्नीकरण प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून लागणारी अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. आयोगाची परवानगी मिळाली तर यावर्षी हे महाविद्यालय सुरू होईल, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
अधिष्ठातापदी डॉ जितेंद्र सकपाळ
वैद्यकीय शिक्षण विभागाने नव्याने सुरु होणाऱ्या या कॉलजेच्या अधिष्ठातापदी डॉ जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती केली आहे. सध्या डॉ सकपाळ जनरल सर्जरी विभागाचे प्राध्यापक म्हणून अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात कार्यरत आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार संभाळून या कॉलेजच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार संभाळण्याचे आदेश विभागाने काढले आहे.