दक्षिण मुंबईत लवकरच मेडिकल कॉलेज?; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:06 AM2024-07-03T06:06:35+5:302024-07-03T06:07:05+5:30

आयोगाची समिती आली त्यावेळी त्यांच्यासमोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई अशा नावाने प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले होते.

Medical College Soon in South Mumbai?; Inspected by National Medical Commission | दक्षिण मुंबईत लवकरच मेडिकल कॉलेज?; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केली पाहणी

दक्षिण मुंबईत लवकरच मेडिकल कॉलेज?; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केली पाहणी

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण मुंबईतील जीटी रुग्णालयाचे रूपांतर मेडिकल कॉलेजमध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. कॉलेज सुरू करण्यासाठी शासनातर्फे लागणारे सक्षमता प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून बंधनकारक असणारे संलग्नीकरण प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून लागणारी अंतिम परवानगी मिळणे बाकी असून गेल्या आठवड्यात आयोगाची समिती तपासणी करून गेली आहे. त्यामुळे आयोगाची परवानगी मिळाली, तर यावर्षी हे महाविद्यालय सुरू होईल, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

आयोगाची समिती आली त्यावेळी त्यांच्यासमोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई अशा नावाने प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे,  केवळ एकट्या जीटी रुग्णालयाचे कॉलेजमध्ये रूपांतर करणे अवघड आहे. त्यामुळे  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनाची पूर्तता करण्यासाठी कामा रुग्णालय आणि जीटी रुग्णालयाला संलग्नीकरण करण्यात आले आहे. या प्रक्रियेस वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून या दोन्ही रुग्णालयांचे मिळून मेडिकल कॉलेज तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परवानगी बंधनकारक असते. त्यांची परवानगी मिळविण्यासाठी त्यांच्या मानांकनाची पूर्तता गरजेचे असते. त्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व एमबीबीएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणाऱ्या सर्व विषयांचे विभाग, लेक्चर हॉल, रुग्णालयातील विशिष्ट बेड्सची संख्या, प्रयोगशाळा या आणि अशा तत्सम गोष्टींची गरज असते. त्याची पूर्तता करता यावी, म्हणून कामा रुग्णालयाची मदत लागणार असल्याने, त्या दोन्ही रुग्णालयाचे संलग्नीकरण करण्यात आले आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाने हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आता विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच या ठिकाणी नेमणूक केली आहे. समितीने संपूर्ण पायाभूत सुविधा, अध्यापक वर्ग, रुग्णालये याची तपासणी आणि माहिती घेतली. त्यांनतर काही दिवसातच त्यांचा अहवाल येणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.  

वैद्यकीय आयोगाच्या समितीने पाहणी केली आहे. त्यांचा अहवाल आता येणे अपेक्षित आहे. तो काही दिवसात येईल. आम्ही सगळी तयारी केली होती. जर परवानगी मिळाली तर यावर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल. - डॉ. जितेंद्र सकपाळ अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई

Web Title: Medical College Soon in South Mumbai?; Inspected by National Medical Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.