मुंबई : बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटामुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते, रुग्णांची हेळसांड होते. प्रसंगी जीवही जातो. या सगळ्याला चाप लावण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद सरसावली असून, सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना आता क्यूआर कोड देण्यात येणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केला की डॉक्टर खरा की बोगस, हे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना लगेच कळू शकणार आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतर्फे बोगस डॉक्टरांच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. सर्वसामान्यांना बोगस डॉक्टर ओळखणे अवघड असते. वस्तुतः या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एक समिती प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असते. मात्र, तरीही बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येतच असतात. विशेषतः ग्रामीण भागात वा गलिच्छ वस्त्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळात अधिक असतो.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतर्फे बोगस डॉक्टरांच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. 'आपल्या डॉक्टरला ओळखा' हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला क्यूआर कोड दिला जाणार आहे. त्यासोबत एक वेगळे अॅपही बनविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व डॉक्टरांची माहिती व शिक्षण उपलब्ध असेल, या उपक्रमावर सध्या काम सुरू असून, लवकरच नागरिकांच्या सेवेत ही योजना येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १ लाख ९० हजारांहून अधिक डॉक्टर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य आहेत. डॉक्टरांच्या परवान्यांचे नूतनीकरण करणे आणि त्यांची सर्व माहिती ठेवण्याचे काम परिषद करते.
आपण ज्या डॉक्टरकडे उपचार घेत आहोत, त्याची संपूर्ण माहिती रुग्णांना असायला हवी. त्यामुळे रुग्णाला आपण कोणत्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहोत याची माहिती मिळेल. क्यूआर कोडमुळे बोगस डॉक्टरांना आळा घालणे सहज शक्य होणार आहे - डॉ. विकी रुघवानी, प्रशासक, वैद्यकीय परिषद.