वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:01 AM2021-07-01T06:01:52+5:302021-07-01T06:01:59+5:30
सरकारमध्ये मोठी जबाबदारी देणार?; गेली ३६ वर्षे होते शासकीय सेवेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ, पद्मश्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना लवकरच वेगळी मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते. गेली ३६ वर्ष ते शासकीय सेवेत होते. १ मार्च २०१९ मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते जे.जे. मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून काम पाहत होते.
रुग्णांसाठी धावून जाणारा डॉक्टर अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. ‘डोळ्याचे डॉक्टर म्हणजे लहाने’ अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. गोरगरिबांना आपलेसे करून त्यांच्यावर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाला आणि जे.जे.च्या नेत्र विभागाला वेगळी ओळख निर्माण झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी आशा भोसले अशा अनेक मान्यवरांनीदेखील विश्वासाने आपले डोळे त्यांच्याकडे सोपविले होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी आपुलकी असल्याने त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्यावर वेगळी मोठी जबाबदारी सरकारमध्येच दिली जाईल, असे समजते.
कोविडच्या काळात काम करताना त्यांनी खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स, रेसिडेंट डॉक्टर्स, बंधपत्रित डॉक्टर यांना आदेश देऊन त्यांच्या नियुक्त्या ग्रामीण व शहरी भागात केल्या. राज्यात कोरोनाची साथ सुरू झाली त्यावेळी ३ प्रयोगशाळा होत्या, त्यांच्या कार्यकाळात १३० शासकीय आणि १२४ खासगी प्रयोगशाळा निर्माण झाल्या. १७ मे १९८५ रोजी ते अधिव्याख्याता म्हणून अंबाजोगाई (जि. बीड) येथे सेवेत रुजू झाले. जे.जे. मधील नेत्र विभाग आणि डॉ. लहाने हे समीकरण अनेक वर्षांपासून आहे.
रुग्णांना दिली दृष्टी
n६६७ शिबिरांमधून ३० लाखांवर रुग्णांची तपासणी करून त्यांनी उपचार केले. तसेच २० लाख रुग्णांवर जे.जे. रुग्णालयात उपचार केले.
n१८० पेक्षा जास्त शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करून एक लाख ३० हजार रुग्णांना दृष्टी परत मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
nजे. जे. रुग्णालयामधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ थॅलमोजॉजी येथे होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये ६०० पासून ते १९ हजार प्रतिवर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया त्यांनी केल्या.
कर्मचाऱ्यांची पदोन्नती
nसहसंचालक पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध संवर्गाची भरती, वर्ग ३ व वर्ग ४च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली.
nबारामती, नंदुरबार येथे मेडिकल महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
nसातारा, अलिबाग व सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.