‘महाअवयवदान मोहीम गावोगाव पोहोचविणार’ - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:59 AM2017-08-27T01:59:19+5:302017-08-27T01:59:57+5:30
देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी, २९ व ३० आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे.
मुंबई : देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी, २९ व ३० आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे. २९ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे गावागावात अवयवदानाविषयी जागृती करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
अवयवदानात गेल्या वर्षी देशात महाराष्ट्र राज्य दुसºया क्रमांकावर होते. या वर्षी राज्यात जागृती केल्यामुळे, अवयवदात्यांची संख्या ४१वरून १३१पर्यंत गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगदान अभियानास महोत्सव स्वरूपात साजरे करण्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमात सूचित केले आहे. त्यानुसार, ३० आॅगस्टला ग्रामीण भागातील प्रत्येक घरांसमोर स्वच्छता करून, अवयवदानाबाबत रांगोळी काढण्याचे आवाहन करण्यात येईल. जिल्हा, तालुकास्तरावर मानवी साखळीतून जागृती करण्यात येईल. या चळवळीत लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अवयवदानाची प्रतिज्ञा
सध्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. महाअवयवदान मोहिमेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २९ आॅगस्ट २०१७ रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. अवयवदान प्रचाराचा ठराव व अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
अवयदानाविषयी जनजागृतीपर रांगोळी
३० आॅगस्टला प्रत्येक घरासमोर अवयवदान जागृतीसंबंधी रांगोळी काढण्याचे ग्रामसभेत आवाहन करण्यात येणार आहे. १८ ते २८आॅगस्ट २०१७ दरम्यान शालेय व उच्च माध्यमिक विद्यालयांत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सव कार्यक्रमांमध्ये अवयवदान देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अवयवदान जागृती पोस्टर स्पर्धेत पाच उत्कृष्ट पोस्टर्सची निवड करून. या पाच उत्कृष्ट पोस्टरचा वापर अवयवदान जागृतीसाठी राज्यातील प्रत्येक रुग्णालय, शासकीय कार्यालय, महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.