- जमीर काझी मुंबई : राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि कच्चे कैदी या बंदीजनांना दिलासा देणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार विविध विकारांबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच साहित्याची उपलब्धता आता कारागृहातच केली जाईल. त्यामुळे निदानात होणाऱ्या विलंबामुळे कैदी दगावणे, प्रकृती बिघाडाच्या प्रकारांना आळा बसणार आहे. यासंदर्भातील तुरुंग प्रशासनाच्या प्रस्तावाला गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.बंदीजनांच्या वैद्यकीय सोयीसुविधांत वाढ करण्यासाठी तब्बल २० लाख ८८ हजार रुपये किमतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच विविध स्तरावरील कारागृहांत ही उपकरणे उपलब्ध केली जातील, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेमुळे कैद्यांना तपासणीसाठी कारागृहातून ने-आण करणे, त्यांची सुरक्षा आणि त्यासाठी लागणाºया मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे.तळोजा कारागृहातील कैदी जोरावर सिंह याला झालेली मारहाण व त्याच्या उपचारावरील दिरंगाईबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याने कारागृह प्रशासनाकडून सोयीसुविधांबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.राज्यातील बहुतांश जेलमध्ये क्षमतेच्या जवळपास दीडपट कैदी आहेत. त्यामध्ये सिद्ध दोष कैद्यांपेक्षा न्यायाधीन कैद्यांची संख्या अधिक आहे. या सर्वांना तपासण्यासाठी जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी असतो, त्याच्याकडून कैद्यावर प्राथमिक उपचार केले जातात. मात्र त्या ठिकाणी प्राथमिक तपासणीसाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे यांचा अभाव आहे. त्यामुळे अनेकदा कैद्याच्या आजारावर तातडीने निदान केले जात नाही किंवा त्याला अन्य शासकीय रुग्णालयांत तपासणीसाठी न्यावे लागते. त्यामुळे कैद्याच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. हे लक्षात घेता आता विविध विकारांबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच साहित्याची उपलब्धता कारागृहातच केली जाईल. त्यानुसार पल्स आॅक्सीमीटर, डिजिटल स्टेथोस्कोप, डिजिटल मायक्रोस्कोप, ईसीजी मशीन, स्ट्रेचर, रिशूसेशन किट, मल्टीपल मॉनिटर, पेशंट ट्रॉली, ड्रेसिंग ट्रॉली, आॅपरेशन टेबल आदी साहित्याची खरेदी केली जाईल.क्षमतेपेक्षा कैदी अधिकमहाराष्ट्रात एकूण ९ मध्यवर्ती कारागृहे असून याशिवाय जिल्हा स्तरावरील अ, ब, क व ड या चार स्तरावर ४५ अशी एकूण ५४ कारागृहे आहेत. त्याची अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी असली तरी प्रत्यक्षात ३१ हजार २१८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २१ हजार ८३३ पुरुष तर १,३८५ महिला कैदी आहेत.
कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जेलमध्येच वैद्यकीय उपकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 5:38 AM