- संतोष आंधळे मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल लागण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, यापुढे उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार असून, सर्व परीक्षांचे निकाल आता दोन आठवड्यांत जाहीर होणार असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.
कर्नाटक येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठात ऑनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणीचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातसुद्धा अशा पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू केले आहे. याकरिता विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील आरोग्य विद्यापीठात कशा पद्धतीने काम चालते यासाठी भेट दिली होती. प्रायोगिक तत्त्वावर गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल अशाच पद्धतीने लावण्यात आले होते.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकातपासणी ऑनलाईन पद्धतीने केली होती. त्यामुळे परीक्षांचे निकाल काही दिवसांतच लावण्यात यशस्वी ठरलो होतो. त्यानंतर सर्व प्रक्रिया राबवून निविदा काढून पेपर तपासणीचे काम संबंधित एजन्सीकडे देण्यात आले आहे. यापुढे सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.- डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
विद्यापीठामार्फत शासकीय आणि विद्यापीठाशी संलग्न अशी सर्व पॅथीची मिळून एकूण ५३६ महाविद्यालये आहेत. दरवर्षी हजारो परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये एम.बी.बी.एस., एम.डी./ एम. एस., नर्सिंग, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, डेंटल, फिजिओथेरपी या आणि इतर सर्व परीक्षांचा समावेश आहे. या
सॉफ्टवेअर देणार अलर्टप्रत्येक महाविद्यालयात डिजिटल इव्हॅल्युशन सेंटर स्थापून परीक्षा समन्वयकाची नेमणूक केली जाते. महाविद्यालयात पेपर स्कॅनिंग व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातील पेपर स्कॅन झाल्यावर सॉफ्टवेअरच्या आधारे संबंधित कॉलेजांना त्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने पाठविल्या जातात. सॉफ्टवेअरच्या आधारावर मार्काची मोजणी होते. एखादा प्रश्न तपासायचा राहून गेल्यास सॉफ्टवेअर अलर्ट देतो.
अभ्यासक्रमांमध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यापैकी अनेक परीक्षा उन्हाळा आणि हिवाळ्यात एकाच वेळी असतात. परिणामी निकाल लागण्यास हमखास उशीर होत असे. हीच बाब लक्षात घेत ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता निकाल वेळेत लागणार आहेत.