कोरोनावर मिळून मात करूया; जागतिक आरोग्य दिनानिमित्त तज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने पुन्हा यू टर्न घेतला आहे. परिणामी पुन्हा एकदा राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र या कोरोनाच्या जागतिक महामारीत कोविड योद्धे मागील वर्षापासून अहोरात्र लढत आहेत. कोरोनाच्या सुरुवातील पीपीई किट घालताना होणाऱ्या त्रासापासून स्वतःला होणाऱ्या संसर्गाची भीती न बाळगता डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि वाॅर्डबाॅय हे कोरोनाला हरविण्यासाठी लढत आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सर्वसामान्यांना न घाबरता कोरोनाला एकत्र येऊन हरविण्याचा संदेश दिला.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्यास काही अंशी सर्वसामान्यांची मानसिकताही कारणीभूत आहे. मात्र आता हा संसर्ग रोखण्यासाठी कोणालाही दोष न देता त्याविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. यंदा काळ पुन्हा परीक्षा पाहत आहे. अशा वेळी स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. आपले जीवन सुदृढ असेल तर नव्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात करता येईल. सध्या कोरोनाचे संकट गडद होत असल्याने सर्वांनी प्रथमतः मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे गरजेचे असल्याचे मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले.
यकृत प्रत्यारोपण व हेपॅटबिलियरी सर्जरीचे सल्लागार डॉ. गौरव गुप्ता यांनी सांगितले की, महामारीच्या काळात आपल्या आरोग्यावरील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामांबाबत आपण दक्ष, जागरूक व सचेत राहण्याचे आवाहन करतो. आहाराबाबत खूपच सजग राहिले पाहिजे आणि नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. उच्च कॅलरीयुक्त व उच्च कर्बोदकयुक्त आहार सेवन करणे टाळा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स व सलाड्सचा समावेश करीत त्यांचे सेवन करा. याव्यतिरिक्त आपल्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्वत:ला उत्पादनक्षम कृतींमध्ये व्यस्त ठेवा, तसेच मित्र व कुटुंबातील नातेवाइकांसोबत व्हर्च्युअली संवाद साधा. शेवटचे, पण महत्त्वाचे म्हणजे नियमितपणे आरोग्य तपासणी करा आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग खोत यांनी सांगितले की, वैद्यकीय किंवा आरोग्यसेवा क्षेत्रातील आम्ही सर्वांत दुर्लक्षित घटक आहोत. मात्र कोरोनाच्या काळात अत्यंत महत्त्वाचे काम अवितरपणे करीत आहोत. कोरोनाच्या आधीच्या लाटेत अनेक सहकाऱ्यांना आम्ही गमावून बसलो आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नव्या जोमाने या कोरोनाविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. अशा स्थितीत सर्वसामान्यांनी आम्हाला सहकार्य करून सर्व प्रकारचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.
* मानसिक आरोग्याचा समतोल राखा
कोरोनाचा काळ अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळे आता शारीरिक आरोग्याप्रमाणचे मानसिक आरोग्याचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्याच्या समस्यांवर औषध घेऊन उपचार करता येतात, परंतु अजूनही समाजात मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोलले जात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळे नैराश्य, ताण, एकटेपणा या समस्या मोडीत काढण्यासाठी संवाद कायम ठेवा. आवडत्या गोष्टींत वेळ घालवा, संगीत ऐका आणि कायम सकारात्मक विचारांवर भर द्या.
- डॉ. जयेश लोहिया, मानसोपचारतज्ज्ञ
...................