Join us

आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 9:16 AM

वैद्यकीय आयोगाने २०२५-२६ या वर्षासाठी पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत.

मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांकडून पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज मागविले असून, राज्यातील काही महाविद्यालये अर्ज करणार आहेत. त्यामुळे वैद्यकीयच्या पदव्युत्तर जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. 

वैद्यकीय आयोगाने २०२५-२६ या वर्षासाठी पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे गरजेचे असून, १७ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे. ज्या वैद्यकीय महाविद्यालयांना पीजी अभ्यासक्रम सुरू करावयाचा आहे, सोबत स्वतंत्र पीजी मेडिकल इन्स्टिट्यूट उघडायचे आहे आणि पीजीच्या जागा वाढवून हव्या आहेत, अशांना अर्ज करण्याची सूचना आयोगाने केली आहे.  जागा वाढणे गरजेचे

वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीजीच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तुलनेत पीजीच्या जागा फार कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा असते. अनेकांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे या जागा वाढल्या तर चांगलीच गोष्ट आहे. 

आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळे नक्कीच पीजी जागा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

विद्यार्थी जास्त, जागा कमी

एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचा कल पीजी अभ्यासक्रमाकडे असतो. मात्र, पीजीच्या जागा फार कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यासाठी दोन ते तीन वर्षे विद्यार्थी नीट परीक्षेचा अभ्यास करतात. त्यामुळे राज्यात पीजीच्या जागा वाढल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :मुंबईवैद्यकीय