मुंबई: वैद्यकीय पदव्युत्तर (एमडी, एमएस) आणि पदव्युत्तर पदविका शिक्षण घेणाऱ्या राज्यातील निवासी डॉक्टरांच्या परीक्षा २३ मेपासून सुरू होणार होत्या. पण, अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण करण्याआधीच परीक्षा दिल्यास मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नोंदणी नियमांनुसार राज्यातील सर्व डॉक्टर अपात्र ठरले असते. हे टाळण्यासाठी पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता ६ जून आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी ठरलेला आहे. त्यानुसार, अभ्यासक्रम पूर्ण केला आणि थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही विषयांत ७५ ते ८० टक्के उपस्थिती आवश्यक असते. पण, २०१६मध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण झालेला नाही. कारण, २०१३मध्ये या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय पदव्युत्तर आणि पदविका शिक्षण हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या वेळी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब झाला असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३६ महिने तर पदविका अभ्यासक्रमासाठी २४ महिन्यांचा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास एमसीआयकडून नोंदणी मिळत नाही. त्यामुळे २३ मे रोजी परीक्षा दिली असती तर राज्यातील साडेचार हजार डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळाली नसती. त्यामुळे मार्डने विद्यापीठाशी चर्चा केली. परीक्षा घेतल्यास संप करण्याचा इशारा मार्डने शनिवारी सकाळी दिला. त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप महिसेकर यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवासी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा २५ जुलै रोजी होणार
By admin | Published: May 22, 2016 3:27 AM