प्राण्यांना मिळणार वैद्यकीय सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:17 AM2018-02-08T02:17:29+5:302018-02-08T02:17:40+5:30
प्राण्यांपासून लेप्टोस्पायरोसिस, रेबीज, बर्ड फ्ल्यू यासारख्या आजारांचा धोका माणसाला असतो. म्हणूनच पाळीव प्राणी व भटक्या जनावरांच्या आरोग्यासाठी परिमंडळीय स्तरावर, पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : प्राण्यांपासून लेप्टोस्पायरोसिस, रेबीज, बर्ड फ्ल्यू यासारख्या आजारांचा धोका माणसाला असतो. म्हणूनच पाळीव प्राणी व भटक्या जनावरांच्या आरोग्यासाठी परिमंडळीय स्तरावर, पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर, प्राण्यांपासून माणसांना होणाºया रोगांच्या निदानाकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळा व निदान सुविधा असलेला प्राण्यांचा दवाखानाही येत्या वर्षभरात सुरू करण्यात येणार आहे.
प्राण्यांच्या अनारोग्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरदेखील होण्याची शक्यता असते. माणसाला होणाºया आजारांपैकी तिनशेहून अधिक आजार हे पशुचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणिजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून होतात. या आजारांना ‘झूनॉटिक डिसिजेस’ असे म्हटले जाते. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रेबीज, अॅन्थ्रॅक्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यांसारख्या आजारांचा समावेश होतो. २०१२ मध्ये करण्यात आलेल्या १९व्या पशुगणनेनुसार मुंबईत ४० हजार ५९८ कुटुंबांमध्ये पाळीव प्राणी आहेत. ही संख्या वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत आहे. या व्यतिरिक्त भटक्या जनावरांची संख्यादेखील मोठी आहे.
पाळीव प्राण्यांच्या किंवा भटक्या जनावरांच्या रोगांवर उपचार करण्यासाठी सध्या महापालिकेचा केवळ एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. खार येथे असलेला हा दवाखाना अद्ययावत करणे आणि प्राण्यांपासून माणसांना होणाºया रोगांच्या निदानाकरिता प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव लवकरच पालिका प्रशासन तयार करणार आहे. यासाठी सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १ कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे.
>भटक्या श्वानांच्या संख्येवरही नियंत्रण
महापालिकेतर्फे पशुवैद्यकीय सेवा प्रथमच परिमंडळीय स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवेंतर्गत मुंबईतील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. निर्बीजीकरण व नियंत्रण कार्यक्रमावर प्रत्यक्ष देखरेख, भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे, पाळीव श्वानांचा परवाना देणे ही सेवा पुढील वर्षभरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे
>यासाठी उभारणार प्रयोगशाळा
खार येथील दवाखान्यासह खासगी पशुवैद्यकांकडून पाळीव प्राण्यांवर आवश्यक ते उपचार केले जातात, पण संसर्गजन्य आजारांबाबत महापालिकेकडे ठोस यंत्रणा नाही, तर खासगी पशुवैद्यकांकडून याबाबतची माहिती उपलब्ध होत नसल्याने, महापालिकेच्या स्तरावर या प्रकारची यंत्रणा असणे आवश्यक झाले होते.
>अशी आहे तरतूद
सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये पशुवैद्यकीय संबंधित बाबींसाठी १४ कोटी ५५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळीय स्तरावरील पशुवैद्यकीय सेवांसंबंधित बाबी, पशुवैद्यकीय दवाखाना व प्रयोगशाळा, पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि देवनार पशुवधगृहाच्या अत्याधुनिकीकरणासाठी करण्यात आलेल्या प्रारंभिक तरतुदींचा समावेश आहे.