Corona Vaccination: दुसऱ्या डोसनंतर वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 05:50 AM2021-03-03T05:50:54+5:302021-03-03T05:51:10+5:30
Corona Vaccination: पालिकेच्या सायन रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळले आहे. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस २२ जानेवारीला तर दुसरा डोस १९ फेब्रुवारीला घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविशिल्ड लसीचा दुसऱ्या डोस घेतल्यानंतर सायन रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सायन रुग्णालय प्रशासनाने दिली.
पालिकेच्या सायन रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळले आहे. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस २२ जानेवारीला तर दुसरा डोस १९ फेब्रुवारीला घेतला. २७ फेब्रुवारीला त्याची तब्येत खालावली आणि तपासणीदरम्यान तो पॉझिटिव्ह आढळला.
याविषयी, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले की, कोरोना लसीचा डोस दिल्यानंतर कोरोनाची लागण झाली, याबद्दल घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यास किमान ४५ दिवसांचा अवधी जावा लागतो. लागण झालेल्या विद्यार्थ्याला दुसरा डोस घेण्याच्या वेळेसच सौम्य लक्षणे होती. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले.
‘घाबरून जाण्याची
गरज नाही’
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, लसीचे डोस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाल्याच्या काही घटना समोर येत आहेत. मात्र त्याला घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, प्रत्येक व्यक्तीने लस घ्यायला हवी, लसीविषयी शंकांचे निरसन कऱणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे लसीचे सर्व डोस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठी कालावधी जावा लागतो. दरम्यान, लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, अंतर राखणे आणि स्वच्छता हे नियम पाळणे बंधनकारक आहे.