मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शोध घेता येणार ‘मेडिकल शोधगंगा’वर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 09:41 AM2023-12-05T09:41:04+5:302023-12-05T09:41:30+5:30

आवडीच्या विषयातले थिसीस कोणी लिहिलेय का?

Medical students can search on 'Medical Shodhganga' | मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शोध घेता येणार ‘मेडिकल शोधगंगा’वर

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शोध घेता येणार ‘मेडिकल शोधगंगा’वर

मुंबई : वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या अखेरीस डॉक्टरांना त्यांच्या आवडीच्या विषयातील शोध प्रबंध (थिसीस) सादर करावा लागतो. संबंधित मेडिकल कॉलेज ज्या विद्यापीठाशी संलग्न आहे तिथे हे थिसीस द्यावे लागते. मात्र, अनेकदा एकाच विषयातील अनेक थिसीस सादर होण्याचा धोका असतो. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ‘मेडिकल शोधगंगा’ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर जाऊन इतरांचे थिसीस पाहता येणार आहेत. राज्यात दरवर्षी ३०२८ विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असतात.

विद्यार्थ्यांना शोध प्रबंध सादर करताना एकाच विषयाचे अनेक प्रबंध सादर केले जाऊ नयेत, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शोधगंगा’ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यापासून प्रेरणा घेत भारतीय वैद्यकीय संशोधन (आयसीएमआर) आणि वैद्यकीय आयोग यांनी संयुक्तपणे ‘मेडिकल शोधगंगा’ सुरू केले आहे. 

‘मेडिकल शोधगंगा’ संकेतस्थळाचा नक्कीच विषय निवडीकरिता फायदा होईल. कारण, आतापर्यंत देशभरात कोणते विद्यार्थी कोणता विषय निवडतात, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. यामुळे थिसीसच्या विषयांचे वैविध्य वाढण्यास मदत होणार आहे. - डॉ. अजय भंडारवार, 
जनरल सर्जरी विभाग प्रमुख, सर जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल कॉलेज

सद्य:स्थितीत २४ विषयांचे १४०० थिसीस या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणत्या विषयावर थिसीस झाले आहेत, कोणता नवीन विषय निवडता येऊ शकेल, हे पाहण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे एकाच विषयात अनेकांनी थिसीस करण्याचे प्रकार टळणार आहेत. याआधी कोणत्या विषयात कोणी थिसीस लिहिले आहे, हे कळत नव्हते. युजीसीच्या ‘शोधगंगा’ संकेतस्थळावर ४ लाख ९८ हजार थिसीस उपलब्ध आहेत.

Web Title: Medical students can search on 'Medical Shodhganga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.