मुंबई : नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयातील भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०) या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मित्राला ‘व्हॉटस् अॅप’वर मेसेज करून आपण आयुष्य संपवणार असल्याची कल्पना दिली होती, असे उघड झाले आहे.भाग्यलक्ष्मी मुठा ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीची असून महापालिकेच्या नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. मात्र अभ्यासक्रम अवघड जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. पालकांनी शिक्षणासाठी मोठा खर्च केल्याने वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडल्यास घरच्यांची बेअब्रू होईल, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये कोणी नसताना तिने पंख्याला ओढणी अडकवून गळफास घेतला. एकच्या सुमारास तिच्या खोलीतील मैत्रीण आली असता हा प्रकार उघडकीस आला. मैत्रिणीने आरडाओरड करत इतरांना कळविले. भाग्यलक्ष्मीला केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांना घटनास्थळी ‘सुसाईड नोट’ आढळली नाही. मात्र आत्महत्येच्या थोड्या वेळापूर्वी तिने ‘रेडिओलॉजी’ विभागात शिकत असलेल्या आपल्या मित्राला ‘व्हॉटस् अॅप’वर त्याबाबत मॅसेज केल्याचे आढळून आल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले.तो मेसेज शेवटचा ठरलाभाग्यलक्ष्मीने मित्राला पाठवलेल्या ‘व्हॉटस् अॅप’ मेसेजमध्ये ‘बीडीएस’चे शिक्षण अवघड जात असून घरच्यांनी शिक्षणासाठी खूप खर्च केल्याने सोडू शकत नसल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. यामुळे निराश असून जीवनाचा अंत करावासा वाटतो, मला सगळ्यांनी माफ करावे, असेही स्पष्ट केले होते. त्यावर मित्राने तिला मेसेज पाठवत समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मित्राच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत भाग्यलक्ष्मीने आयुष्य संपवले.
मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नायर हॉस्पिटलमधील घटना, अभ्यासाचा ताण आल्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 4:49 AM